पुणे ते नागपूरदरम्यान सुपरफास्ट विशेष गाडी; आठवड्यातून तीन दिवस धावणार 

चेतन चौधरी
Monday, 8 February 2021

गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयनयान आणि चार द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येणार आहेत. 

भुसावळ (जळगाव) : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते नागपूरदरम्यान त्रि- साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी सुरू केली आहे. ही विशेष रेल्वेगाडी पुणे येथून रविवारपासून (ता. ७) दर मंगळवार, गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. 
ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस (०२०३५) पुण्याहून ५.४० ला सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपूरला ९.१० ला पोचणार आहे. तर नागपूर येथून ही गाडी (०२०३६) दर सोमवार, बुधवार आणि शनिवार असे तीन दिवस सहाला सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्याला ९.०५ ला पोचणार आहे. 

अशा असतील बोगी
गाडीला दौंड कॉर्ड लाइन, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयनयान आणि चार द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येणार आहेत. 

पूर्णपणे आरक्षित गाडी 
ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून, सुपरफास्ट विशेष गाडीसाठी (०२०३५/०२०३६) आरक्षण सामान्य भाडे दराने आरक्षण केंद्रावर तसेच संकेतस्थळावर सुरू झाले आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news pune nagpur special super fast railway start