esakal | चांगल्या पावसाचा परिणाम; कपाशीतून २६०० कोटींची उलाढाल 

बोलून बातमी शोधा

cotton}

कपाशीचा पेरा पाच लाख २५ हजार हेक्टरवर झाला होता. यातून सुमारे ५२ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस उत्पादित झाल्याचा अंदाज आहे. चांगल्या पावसाने कपाशीचे उत्पन्न भरघोस आल्याने शासनाने पणन महासंघ व सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू केली होती.

चांगल्या पावसाचा परिणाम; कपाशीतून २६०० कोटींची उलाढाल 
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : निसर्गाने साथ दिल्याने यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. यामुळे खरिपात शेतकऱ्यांना कपाशीचा अधिक पेरा करता आला. बोंडअळीने केलेले नुकसान, अतिवृष्टीने दहा ते पंधरा टक्के नुकसान आले असले तरी, ५२ लाख क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी शासनासह खासगी व्यापाऱ्यांनी यंदा केली. एका क्विंटलला सरासरी पाच हजारांचा दर पकडला तरी दोन हजार ६०० कोटींची उलाढाल कपाशी खरेदी विक्रीतून यंदा झाली. जिल्ह्यात यंदा पावसाने उशिराने हजेरी लावली. मात्र नंतर तो चांगला झाला. कपाशीचा पेरा पाच लाख २५ हजार हेक्टरवर झाला होता. यातून सुमारे ५२ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस उत्पादित झाल्याचा अंदाज आहे. चांगल्या पावसाने कपाशीचे उत्पन्न भरघोस आल्याने शासनाने पणन महासंघ व सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू केली होती. 

अशी उलाढाल
शासनातर्फे कपाशीला पाच हजार ६०० ते पाच हजार ८२५ असा दर होता. तर खासगी व्यापाऱ्यांनी चार हजार ५०० ते सहा हजार असा दर दिला. यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेला कापूस विकण्यास प्राधान्य दिले. वरील दराचा विचार करून सरासरी क्विंटल पाच हजार रुपये धरल्यास ५२ लाख क्विंटलमधून सुमारे दोन हजार ६०० कोटींची उलाढाल झाल्याचे जाणकार सांगतात. अजूनही पंधरा ते वीस टक्के कापूस शिल्लक आहे. कपाशीच्या उत्पादनात महाराष्ट्र अव्वल आहे. त्यात जळगावसह खानदेश व यवतमाळ जिल्हा प्रथम स्थानी आहे. कपाशीचा दर्जा सर्वोत्कृष्ट असल्याने परदेशातही आपल्याकडील कापसाला चांगली मागणी आहे. तुर्की, बांगलादेश, पाकिस्तान, व्हीएतनाम या देशात कापूस निर्यात होतो. 
 
गाठींच्या निमिर्तीत २० टक्के घट 
यंदा शासनाने कपाशीला चांगला भाव दिल्याने एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के कापूस सीसीआय व पणन महासंघाने खरेदी केला. २५ टक्के कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे आला. यामुळे दरवर्षी वीस लाख गाठींची निमिर्ती होते ती यंदा होऊ शकलेली नाही. वीस टक्के घट गाठीच्या निर्मितीत आली असल्याची माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंगचे ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे