..तर खडसेंच्या निर्देशानुसार निर्णय 

दिलीप वैद्य
Monday, 28 December 2020

जिल्ह्यातील अमळनेर येथील पंचायत समितीची सत्ता भारतीय जनता पक्षाला नाट्यमयरीत्या गमवावी लागली. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे नेते सभापती जितू पाटील आणि उपसभापती जुम्मा तडवी यांना राजीनामा देण्यास सांगतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रावेर (जळगाव) : येथील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींनी राजीनामे दिले आणि नवीन पदाधिकारी निवडीची वेळ आली तर ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निर्देशानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवा उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनी व्यक्त केली आहे. 
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यावर त्यांनी याबाबत संवाद साधला. श्री. पाटील म्हणाले, की आम्ही सभापती आणि उपसभापती यांच्या राजीनाम्याची वाट पाहत आहोत. असे झाल्यास उर्वरित काळासाठी होणारा सभापती हा ज्येष्ठ नेते श्री. खडसे यांच्या निर्देशानुसार होईल. आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले, की पंचायत समितीत महाविकास आघाडीचे संख्याबळ चार आहे. पण नवीन पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतल्यास आपण आघाडीसोबत आहोत. 

अमळनेरची सत्‍ता भाजपने गमावली
दरम्यान, जिल्ह्यातील अमळनेर येथील पंचायत समितीची सत्ता भारतीय जनता पक्षाला नाट्यमयरीत्या गमवावी लागली. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे नेते सभापती जितू पाटील आणि उपसभापती जुम्मा तडवी यांना राजीनामा देण्यास सांगतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन पदाधिकारी निवडीत भारतीय जनता पक्षाच्या आठ सदस्यांपैकी कोण काय भूमिका घेईल, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. त्यातील दोन पंचायत समितीचे सदस्य श्री. खडसे यांची भेट घेऊन आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते सभापती- उपसभापती यांचे राजीनामे घेण्याचा जुगार खेळतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती जितू पाटील यांनी सांगितले, की कोअर कमिटीची अशी काही बैठक झाल्याचे आपल्याला माहिती नाही, पण पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याचे पालन करू. 

..असे आहे बलाबल 
रावेर पंचायत समितीत १२ पैकी ८ सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस- २, काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. याबाबत निर्णय काहीही होवो, पण या वाढलेल्या थंडीत सभापती-उपसभापती निवडीच्या विषयावर तालुक्यात गरमागरम चर्चा सुरू आहे, हे नक्की! 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news raver panchayat samiti eknath khadse ncp