esakal | खड्डा चुकविण्यात बस- मोटारसायकलची धडक; एकाचा मृत्‍यू, दोघे जखमी

बोलून बातमी शोधा

accident}

राज्‍य परिवहन महामंडळाचे बस (क्रमांक एमएच 20, बीएल 0910) रावेर आगाराची बस सकाळी पावणे आठला रावेरहून अजंदे गावाकडे जात होती. रावेरपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर नविन विश्रामगृहाच्या मागे वळणवरील खड्डा चुकवण्याच्या नादात

खड्डा चुकविण्यात बस- मोटारसायकलची धडक; एकाचा मृत्‍यू, दोघे जखमी
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर (जळगाव) : खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात येथील अजंदा रोडवर एसटी बस व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यात झालेल्‍या अपघातात मोटारसायकलस्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. दोघांना पुढील उपचारार्थ जळगावला पाठविण्यात आले आहे.
राज्‍य परिवहन महामंडळाचे बस (क्रमांक एमएच 20, बीएल 0910) रावेर आगाराची बस सकाळी पावणे आठला रावेरहून अजंदे गावाकडे जात होती. रावेरपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर नविन विश्रामगृहाच्या मागे वळणवरील खड्डा चुकवण्याच्या नादात बस व अजंदेकडून येणारी मोटरसायकल (क्र. एमएच, 19, डिके 3014) यांची समोरासमोर धडक होऊन या अपघातात गोकुळ बाबुराव पाटील (वय 55), सचिन रमेश पाटील (वय 12, रा. धामोडी) हे गभीर जखमी झाले. तर विठ्ठल बाळू पाटील (वय 25) राहणार (मोहराळा, ता. यावल) हल्ली मुक्काम धामोडी याचा मृत्यू झाला. 

मावसभावाला शाळेत सोडण्यासाठी जात होता विठ्ठल
विठ्ठल पाटील हा धामोडी येथे मावशीकडे दहा वर्षांपासून शिक्षणासाठी आला होता. फैजपूर येथे एम. एसस्‍सीचे शिक्षण घेत होता. त्‍याचा मावस भाऊ सचिन यास रावेर येथे शाळेमध्ये सोडण्यासाठी येत होता. त्यांच्यासोबत धामोडी येथील विद्यालयाचे कर्मचारी गोकुळ बाबुराव पाटील हे बाहेरगावी जात असल्याने रावेरपर्यंत मोटरसायकलवर येत होते. याबाबत येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार यांच्या फिर्यादी वरून बसचालक आय. टी. खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहे.

याच खड्ड्यामुळे असंख्य बळी
नवीन विश्रामगृह ते अजंदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन विश्राम गावापासून सुमारे अर्ध्या किलोमीटरवर मात्राण नाल्यावर एक पूल आहे. पुलाच्या पलीकडे रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला असून हा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात सुमारे चार महिन्यांपूर्वी एक केळीचा ट्रक नाल्यात जाऊन पडला होता आणि दोन युवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिन्याभरातच एक प्रवाशांनी भरलेली ॲपे रिक्षा त्याच ठिकाणी नाल्यात पडली होती.आजच्या अपघातापूर्वी देखील येथेच अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. रस्त्याला वळण असल्याने पलीकडून येणारे वाहन दिसत नाही. झुडपे वाढल्यानेही गंभीर अपघात होतात हे माहिती असूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालेले असल्याचे दिसते. हा विभाग आणखी किती बळी गेल्यावर हा खड्डा बुजवणार आहे? आणि या रस्त्यावरील झुडपे काढणार आहे? तसेच या रस्त्याचे त्या ठिकणी रुंदीकरण करावे असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे