esakal | सातपुड्यातील गावे..ना सक्षम आरोग्‍य सेवा तरीही कोरोना दूरच

बोलून बातमी शोधा

satpuda aadivasi pada

सातपुड्यातील आदिवासी भागातील काही गावांमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ही माहिती अधिकृत आहे. आरोग्य विभागाने यास दुजोरा दिला आहे. हे एक आशादायक चित्र आहे. 

सातपुड्यातील गावे..ना सक्षम आरोग्‍य सेवा तरीही कोरोना दूरच
sakal_logo
By
प्रवीण पाटील

सावदा (जळगाव) : गेल्या वर्षी चीनमधून आढळुन आलेल्‍या कोरोनाने जगभरात पसरून देशासह राज्यातही कहर केला आहे. यावर्षी याची दुसरी लाट आली आणि त्यात लाखांच्या घरात रुग्ण संख्या व असंख्य रुग्ण दगावत आहे. काही ठिकाणी तर एकाच कुटूंबातील एका पेक्षा अधिक जण बळी पडत आहे. अशा बिकट परिस्थितीत एकही गाव अस नसेल की त्या गावात कोरोनाचा शिरकाव झाला नसेल; असे वाटणे साहजिक आहे. पण हे खर नाही, कारण रावेर तालुक्यातील सातपुड्यातील आदिवासी भागातील काही गावांमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ही माहिती अधिकृत आहे. आरोग्य विभागाने यास दुजोरा दिला आहे. हे एक आशादायक चित्र आहे. 
सातपुड्यातील गारखेडा, निमड्या, मोरव्हाल, गुलाबवाडी, गारबर्डी, भंगीपाडा, सायबुपाडा, कासायाचा पाडा, गज्याचा पाडा, मोहमांडली आणि अंधार मळी या अती दुर्गम भागात सध्या तरी कोरोनाचा एकही रुग्ण गेल्या वर्षभरात आढळून आलेला नाही. गावाच्या दृष्टीने हा निश्‍चितच समाधानाची बाब म्हणता येईल. सातपुड्यातील वाड्या पाड्या वस्तीत वसलेले ही सर्व गावे आहे. 

शुद्ध हवा दाट वस्‍ती नाही
प्रामुख्याने आदिवासी पावरा, भिल, तडवीया समाजाची वस्ती, गावांची लोकसंख्याही तशी काही शेकडा व एक दोन हजाराच्या आतच आहे. जंगलातील वातावरणाशी समरस झालेले कुटुंब रात्र- दिवस कष्ट करणारी माणस. गावचे वैशिष्ट हे की निसर्ग वातावरणात व नेहमी शुद्ध हवा असलेली ही गावे असून दाट वस्ती नाही. चार झोपड्या या टेकडीवर तर पाच झोपड्या दुसऱ्या टेकडीवर आहेत. महत्वाचे म्‍हणजे शहरी वातावरणापासून ही गावे कोसो दूर आहे. शहरातून या गावात फारसे कोणीही येणारे व जाणारेही नाही. कदाचित या कारणामुळे या गावामध्ये कोरोना व्हायरस संक्रमणचा शिरकाव झालेला नसेल असं म्हटल तर वावगे ठरू नये. 

जेमतेम आरोग्य सेवा पण कोरोना नाही 
मुळातच ही गावे दुर्गम आदिवासी भागात आहेत. राहणीमानाचा विचार केला तर साधी भाजी, ठेचा भाकरी खाऊन जगणारे आदिवासी कुटुंब. नेहमी दगड मातीशी संबंध येणारी माणसे. स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक साबण आदी वस्तू तरी त्यांना मिळत असाव्यात की नाही ही शंकाच आहे. गावात खाजगी डॉक्टर, मेडिकल स्टोअर नाहीच. सरकारी दवाखाना म्हटला तर या सर्व गावापासून ८-१० किमी अंतरावरील पाल येथील ग्रामीण रुग्णालय आहे. या गावामध्ये कोविड सर्वेक्षणही करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षात एकही कोरोना रुग्ण नाही ही नक्कीच समाधानाची बाब आहे. 

कोरोनापासून मुक्त असलेली सातपुड्यातील ही गावे आदिवासी भागातील आहेत़. या गावातील लोक जास्त त्यांच्याच कम्यूनिटी मध्येच राहतात. धाडसी वृत्तीचे आहेत. त्यांच्या गावात कोरोना आजाराने शिरकाव केला नाही; ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. पुढेही या गावांमध्ये कोरोनाचे संक्रमण होता कामा नयेत हीच अपेक्षा आहे. आदिवासी भाग असल्याने या भागात चांगली आरोग्य सेवा देण्याचा आरोग्य विभागाचााा प्रयत्न आहेच. 
- डॉ. शिवराय पाटील, वैद्यकीय अधिकारी, रावेर 

संपादन- राजेश सोनवणे