सातपुड्यातील वणवा अजूनही विझेना; वनविभाग झोपेत, मुक्‍या प्राण्यांचा बळी

अमोल महाजन
Wednesday, 3 March 2021

यावल वनविभागाच्या हद्दीत सातपुड्याचे मोठे क्षेत्र असून यात अनमोल अश्या औषधी वनस्पती आहेत परंतु दैनंदिन लागत असलेल्या आगीत या नष्ट होत आहेत.

धानोरा (जळगाव) : मार्च महिन्यात सातपुडा पर्वतावर चोपडा व यावल वनविभागात वणवे लागल्याचे प्रकार सरोजपणे सुरू असून यामुळे लाखो एकर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. तर येथील प्राण्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे. एवढ्या भयावह वणव्याबद्दल वनविभाग सुस्त दिसत असून अद्याप एकही कारवाई करण्यात आली नसल्याने निसर्ग प्रेमींना वनविभागप्रती संताप अनावर झाला आहे. 
यावल वनविभागाच्या हद्दीत सातपुड्याचे मोठे क्षेत्र असून यात अनमोल अश्या औषधी वनस्पती आहेत परंतु दैनंदिन लागत असलेल्या आगीत या नष्ट होत आहेत. वनविभागाच्या या दुर्लक्षित पणाच्या धोरणाबद्दल वनमफिया व यांच्यात काही साटेलोटे असल्याचे वणप्रेमीमधून बोलले जात आहे. 

उपाययोजना नाहीत
वणवा उंच टेकड्यावर लागत असल्याने वणवा विझवण्यासाठी जातांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फार अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरमग याच ठिकाणी जाऊन वनमफिया आगी कसे काय बरे लावतात? हा एक गहन प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचा अर्थ असा होतो की वनविभागाजवळ पर्वतावर लागलेल्या आगी विझविण्यासाठी शासनाकडून काहीएक उपायययोजना नसल्याचे स्पष्ट होते.

संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कागदावरच
दरवर्षी वनविभागाकडून लाखो रुपये खर्चुन वृक्ष लागवड केली जाते. मात्र, वणव्यांमुळे वृक्षांची होळी होऊन शासकीय निधीचीही राख होत आहे. वणवा लागल्याने वृक्षराजी बहरते हा गैरसमज आहे. यावल वन विभागामध्ये वनालगतच्या  गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत, तरीही वणवे लागून अपरिमित हानी टाळण्यास वनविभागाला अपयश येत आहे.

वणाधिकाऱ्यांचा वचक संपला
सातपुड्यावर गवताला आग लावण्याच्या प्रकारावरून वन विभागाने एकही कारवाई न केल्यामुळे वनमफियावर वणाधिकाऱ्यांचा वचक संपला की काय असे निदर्शनास येत आहे. मोठमोठ्या डोंगररांगांना लागणारे वणवे थांबवण्यासाठी या विभागाने काही तरी वेगळा उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वनाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. आगी लावणाऱ्यांमध्ये वनविभागप्रति दहशत बसावी यासाठी तशी कारवाई डोंगरांना वणवे लावणाऱ्यांवर करणे जरूरीचे झाले आहे.

मुक्या प्राण्यांचा बळी
मार्च महिन्याची सुरुवात झाली असून ऊन तापू लागले आहे. तर रात्रीच्या वेळी जंगलांना आगी लावण्याचे प्रकारही होत असल्याने मुक्या जीवांना आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळावे लागत आहे. मार्चच्या मध्यावर रात्रीच्या वेळी जंगलांना आगी लावण्याचे प्रकार होत असून, या वणव्यांनी आसमंत रक्ताळून जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. या आगीत जंगलात अधिवास असलेल्या प्राणी-पक्ष्यांच्या कोवळ्या जीवांचा हकनाक बळी जात आहे. घरट्यातील पिले व वन्यप्राण्यांची नवी पिढी जळून खाक होत आहे. यावेळी होणारा पक्षी-प्राण्यांचा वणवा पेटवून मुक्या जीवांचा जीवघेणाऱ्यांवर खटले दाखल करण्याची मागणी पक्षी-प्राणीप्रेमींकडून होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news satpuda mountain fire continue