जंगल परिसरात अग्‍नितांडव; वन्य प्राण्यांचा मृत्‍यू

राजेश सोनवणे
Thursday, 28 January 2021

शिरसोली रस्त्याच्या परिसरात बुधवारी रात्री अचानक आग लागली. बघता बघता दीडशे एकर जंगल परिसरात आग वेगाने पसरली. आगीचा प्रकार लक्षात येताच काही व्यक्तींनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

जळगाव : शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यालगत असलेल्‍या जंगल परिसरात रात्रीच्‍या सुमारास आगीचा भडका उडाला. जवळपास दीडशे एकर परिसरात आग पसरल्‍याने यात वन्य प्राण्यांचा होरपळून मृत्‍यू झाला.

शिरसोली रस्त्याच्या परिसरात बुधवारी रात्री अचानक आग लागली. बघता बघता दीडशे एकर जंगल परिसरात आग वेगाने पसरली. आगीचा प्रकार लक्षात येताच काही व्यक्तींनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. यानंतर अग्‍निशमक दलाच्या बंबांनी आग विझविण्यात आली.

नागरीकांचे प्रयत्‍न अपुर्ण
मोहाडी गावातील ग्रामस्थ आग विझविण्यासाठी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांसह तरूणांकडून झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र आग आटोक्‍यात येत नव्हती. घटनास्थळी पोहचलेल्या चार अग्निशमन बंबाच्या सहायाने आग विझविण्यात आली.

वन्य प्राण्यांचा मृत्‍यू
शिरसोली ते मोहाडी दरम्‍यान असलेल्‍या दीडशे एकर परिसरात रात्रीच्या वेळी आग लागल्‍याने विझविण्यास विलंब झाला. या आगीत वन्य प्राण्यांचा मृत्‍यू झाल्‍याचे पाहण्यास मिळाले. आग विझविल्‍यानंतर पाहिल्‍यानंतर येथे मोर, बकऱ्या, जंगली कुत्र्यांचा होरपळून मृत्‍यू झाला होता. तसेच सातशे ते आठशे झाडे देखील जळाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news shirsoli forest aria fire