अंधश्रद्धेचा कहर..विष उतरविण्यासाठी भोंदूबाबाजवळ नेले अन्‌ युवतीचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

सर्पमित्राने दुपारी दोनला घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी शारदाला फाफोरे येथे नेण्यात आल्याचे समजल्यावर त्यांनी रामचंद्र भिल यांच्याशी संपर्क करून शारदाला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी कळकळीची विनंती केली.

कासोदा (जळगाव) : आजही भोंदूगिरीवर व तंत्रमंत्रावर ग्रामीण भागातील अशिक्षित जनता विश्‍वास ठेवत असून, अशीच घटना येथून जवळच असलेल्या वनकोठे येथे घडली. येथील शारदा रामचंद्र भिल (वय १७) ही अकरावीत शिकत असलेली युवती अंधश्रद्धेला बळी पडल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. 
वनकोठे येथील रामचंद्र देवचंद भिल हे पत्नी, दोन मुलगे, दोन मुलींसह मजुरी करून उदरनिर्वाह करतात. रविवारी (ता. २१) सकाळी दहापूर्वी शारदा घरासमोर बांधलेल्या शेळ्या चारण्यासाठी सोडायला गेली असता तिला उजव्या हाताच्या करंगळीच्या वरील भागाला नाग जातीचा साप चावला. तिला वडील रामचंद्र भिल व त्यांचा मित्र दुचाकीने फाफोरे (ता. अमळनेर) येथे बहिरम बाबा मंदिरात सापाचे विष उतरविण्यासाठी घेऊन गेले. 

दवाखान्यात नेईपर्यंत झाला उशीर
परंतु शारदाची तब्येत जास्तच बिघडत असल्याने तिला परत वनकोठे येथील घरी घेऊन आले व ग्रामस्थांच्या सांगण्यावरून १०८ रुग्णवाहिकेला फोन करून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री आठला दाखल केले. त्या वेळी तेथील डॉ. कैलास पाटील यांनी तपासून शारदा मृत झाल्याचे घोषित केले. शारदाचा मृतदेह एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात रात्रभर ठेवून सोमवारी सकाळी अकराला डॉ. कैलास पाटील व मुकेश चौधरी यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. शोकाकुल वातावरणात शारदा भिल हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत रामचंद्र भिल यांनी दिलेल्या माहितीवरून एरंडोल पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सर्पमित्रांच्या विनंतीकडे दुर्लक्ष
दरम्यान, मुकेश शिवनारायण सोनार या सर्पमित्राने दुपारी दोनला घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी शारदाला फाफोरे येथे नेण्यात आल्याचे समजल्यावर त्यांनी रामचंद्र भिल यांच्याशी संपर्क करून शारदाला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी कळकळीची विनंती केली. मात्र, ते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे मुलीला जीव गमवावा लागला. वेळीच उपचार मिळाला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, असे सर्पमित्र सोनार यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news snake bite girl death havoc of superstition