‘बेस्‍ट’च्या सर्व्हीसनंतर लगेच ड्युटी; कोरोना टेस्‍टचा अहवाल येण्यापुर्वीच सक्‍ती

राजेश सोनवणे
Tuesday, 29 December 2020

कोरोनामुळे तोट्यात गेलेली एसटी बाहेर निघत आहे. यामध्ये मुंबईची बेस्‍ट सेवा ही लॉकडाउन संपल्‍यानंतर लागलीच सुरू करण्यात आली होती. ती आता देखील सुरूच आहे. 
 

जळगाव : कोरोनाच्या काळात बिकट संकटात सापडलेली एसटी गतीमान होत आहे. यात मुंबईची बेस्‍ट सर्व्हीस सुरू असल्‍याने तेथे राज्‍यातील विविध विभागातील चालक- वाहकांना आठ दिवसांकरीता सेवा बजाविण्यासाठी जावे लागत आहे. आठ दिवसांची सेवा पुर्ण करून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्‍ट बंधनकारक असून, ती केलीही जात आहे. मात्र, कोरोना अहवाल येण्यापुर्वीच चालक- वाहकांना दुसरी ड्युटी लावण्यात येत असल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. 
कोरोना संसर्गाचा धोका अजून पुर्णपणे संपलेला नाही. नवीन बाधीतांची संख्या अजूनही चिंता वाढविणारी आहे. त्यातच अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार वाढत असताना देशात आणि राज्‍यात याची खबरदारी घेतली जात आहे. अर्थात्‌ राज्‍यात रात्रीची संचारबंदी लागू केली असली तरी, दिवसा सर्वदूर गर्दी पाहण्यास मिळत आहे. सर्व सेवा देखील सुरू आहेत. अशा स्‍थितीत कोरोनामुळे तोट्यात गेलेली एसटी बाहेर निघत आहे. यामध्ये मुंबईची बेस्‍ट सेवा ही लॉकडाउन संपल्‍यानंतर लागलीच सुरू करण्यात आली होती. ती आता देखील सुरूच आहे. 
 
अहवाल येण्यापुर्वीच दुसरी ड्युटी 
जळगाव विभागातील सर्व आगारांमधून चालक- वाहकांची ड्युटी मुंबईच्या बेस्‍ट सेवेकरीता लावण्यात येत आहे. आठ दिवस सेवा दिल्‍यानंतर परत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्‍ट देणे बंधनकारक आहे. यात अँटीजेन टेस्‍टद्वारे अर्धा तासात रिपार्ट मिळाल्‍यास ड्युटी लावणे योग्‍य आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्‍ट केल्‍यास त्‍याचा रिपोर्ट येण्यास एखादेवेळी तीन- चार दिवसांचा अवधी लागत असतो. अशा स्‍थितीत अहवाल येण्यापुर्वीच चालक- वाहकांच्या लोकलच्या ग्रामीण ड्युटी लावण्यात येत असल्‍याचा प्रकार समोर आला आहे. 

धोका अधिक 
अशा स्‍थितीत एखाद्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झालेली असल्‍यास त्‍यांच्यामुळे संसर्ग अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. याचा विचार वरिष्‍ठ अधिकारी करत नसून, सरळपणे ड्युटी लावत आहेत. विशेष म्‍हणजे कोरोनाची टेस्‍ट दिल्‍यानंतर संबंधीतास परिवारातील सदस्‍यापासून दूर राहण्यास सांगितले जात असते. पण महामंडळातील अधिकारी मात्र प्रवाशांशी संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावत आहेत. 

प्रत्‍येकाने काळजी घेणे महत्‍त्‍वाचे आहे. बेस्‍टची सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लागत आहे. मुळात विभागात कर्मचारी संख्या कमी असून बेस्‍टची सेवा आणि त्‍यानंतर सहा- सात दिवस घरी राहिल्‍यास सेवेवर परिणाम होवू शकतो. अँटीजेन टेस्‍ट करून घेणे अधिक चांगले राहिल. 
- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग रा. प. महामंडळ. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news st bus driver conductor mumbai best service and corona test