
कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये, रसवंतीगुहे दिलासादायक वाटत आसल्यामुळे या शीतपेयांना व रसवंती गृहामध्ये ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव : उन्हाळ्याची चाहुल लागताच शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र शीतपेयाची दुकाने थाटली आहेत. मात्र, जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नाही; तोपर्यंत ग्राहक वळत नाही असे चित्र निर्माण होत असते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाली असून नागरीक थंड शीतपेय व रसवंती गृहाकडे वळु लागले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली, तरी उघड्यावर शीतपेये आणि रसवंतीगृह विक्री करणारे विक्रेत्यांचे थोड्याफार प्रमाणात अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.
कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये, रसवंतीगुहे दिलासादायक वाटत आसल्यामुळे या शीतपेयांना व रसवंती गृहामध्ये ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. फुल ग्लास रस दहा रूपयांमध्ये मिळत असल्याने मोठी गर्दी या ठिकाणी होताना दिसत आहे. थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, मठ्ठा, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडी, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट आशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळाने व रंगाने दुकाने थाटली आहेत. फेब्रुवारी- मार्च महिन्यात उन्हाचे चटके कमी जाणवत आसतात तरी तापमान कमी आसताना सुध्दा रसवंतीगृह आणि शीतपेयाच्या दुकानाना गर्दी दिसून येत आहे.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी आता सरबत, उसाचा रस, आईस्क्रीम, कुल्फी, लिंबू-सरबत यांसारख्या थंड पदार्थांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. सध्या थंडपेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक पेयांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आईस्क्रीमचे विविध प्रकार
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिक आईस्क्रीम खाणे जास्त पसंत करतात. बाजारात विविध प्रकारचे म्हणजेच काजू, पिस्ता, केशर, व्हॅनिला, हिरामोती, गुलकंद, पानमसाला, अमेरिकन ड्रायफ्रूट यासारखे आईस्क्रीम उपलब्ध आहे. लहान मुलांना फळांचे व चॉकलेटचे आईस्क्रीम पसंत असल्यामुळे संध्याकाळच्या सुमारास नागरिक परिवारासोबत जाऊन आईस्क्रीमचा आनंद घेताना दिसून येत आहेत. हे आईस्क्रीम 10 ते 50 रुपयांना मिळते.
थंडगार लिंबूसरबत
नूकतेच लग्नसराई सुरू झाल्यामुळे लग्नात मठ्ठा, ताक, तसेच लिंबूसरबत मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. पाणी पिण्यापेक्षा लोक जास्तीत जास्त लिंबूसरबत पितात. अनेक ठिकाणी मठ्ठा व जलजिराच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. साधारणपणे 10 रुपये ग्लास मिळणारा हा जलजिरा सर्वांनाच आवडतो. महाविद्यालय, शाळा, मंगल कार्यालय या भागांमध्ये या गाड्या दिसतात.
बर्फगोळा लोकप्रिय
उन्हाळ्यात बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलते आकर्षण असते. विविध रंग, चवींत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे. साधा गोळा, मावा गोळा, आईस प्लेट यांसारखे प्रकार यात उपलब्ध आहे यामुळे आईस्क्रीम पार्लरची संख्या वाढली आहे. तरीही बर्फगोळ्याचे महत्त्व अद्याप टिकून आहे. बर्फाचा गोळा घेण्यासाठी लहान मुले गाड्यांभोवती गर्दी करीत असल्याचे दिसून येते. गोळ्यांच्या दरात वाढ झाली आहे.
ज्यूसला मागणी
परिसरात ज्यूसची दुकाने लावण्यात आली आहे. विविध प्रकारचे सरबत याठिकाणी उपलब्ध आहे. चॉकलेट शेक, कोल्ड कॉफी, लिंबू सरबत, रोझ मिल्कशेक, तसेच अननस, स्ट्रॉबेरी, चिकू, सफरचंद, संत्री या फळांच्या ज्यूसची मागणी वाढली आहे. हे सर्व प्रकारचे ज्यूस साधारणपणे 10 ते 40 रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत. अन्य शीतपेयांच्या तुलनेत उसाचा रस स्वस्त व मस्त असल्याने त्याला या दिवसांत अधिक मागणी दिसून येते.