esakal | महिनाभरात ५ वेळा लसीकरण केंद्रे बंद; पालकमंत्री पुरवठ्याविषयी बोलेनात

बोलून बातमी शोधा

vaccination center
महिनाभरात ५ वेळा लसीकरण केंद्रे बंद; पालकमंत्री पुरवठ्याविषयी बोलेनात
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. मात्र, लशींचा पुरवठा नसल्याने महिनाभरात तब्बल पाच वेळा लसीकरण केंद्रे बंद करण्याची नामुष्की आरेाग्य प्रशासनावर आली. पालकमंत्र्यांनी दांडगा पाठपुरावा केला असता, तर लसी जिल्ह्याला मुबलक उपलब्ध झाल्या असत्या. त्यामुळे केंद्रे बंदच झाली नसती. मात्र, त्यांनी का लशी उपलब्ध करण्यावरून का चुप्पी साधली आहे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

महिन्याभरात जिल्ह्यातील १४ लाख २२ हजार लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले होते. मात्र, महिन्याभरात तब्बल पाच वेळा लसीकरण केंद्रे लशींअभावी बंद करावे लागले. जिल्ह्यात १११ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

लसीकरण केंद्र व उपक्रेंद्रावर एक परिचारिका (नर्स) व सहाय्यक असा स्टाफ आहे. हे कर्मचारी दिवसाला शंभर ते २०० याप्रमाणे १५ ते २० दिवसांत एक हजार ५०० ते दोन हजार नागरिकांना लसीकरण करतील. शंभर टक्के लसीकरणासाठी महिनाभराचा कालावधी लागणार होता. लसीकरणाचे योग्य नियोजन आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाने केले असताना, लसींचा हव्या त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. यामुळे एक महिन्यात होणारे लसीकरण किती काळ चालेल. हेही सांगणे आता कठीण असल्याचे विदारक चित्र आरोग्य विभागाचे आहे.

१२९ केंद्र पण अपुरा पुरवठा

जिल्ह्यात सद्य:स्थितीत लसीकरण मोहीम महापालिका, पालिका रुग्णालयांसोबत ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १२९ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. मात्र, या केंद्रावर लसींचा अपुरा पुरवठा होतो. बुधवारी (ता. २८) सकाळीपासून सर्वच केंद्रांवरील लसी संपल्याने केंद्रेच बंद होती. अनेक ज्येष्ठ नागरिक उन्हात लसीकरण केंद्रावर जात होते. मात्र, लसी उपलब्ध नसल्याने त्यांना लस न घेता परतावे लागले.

एक तारखेनंतर केंद्रावर गोंधळाचा धोका ?

आताच ४५ वर्षांवरील नागरिकांना लसी मिळत नाही. दुसरीकडे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण होणार आहे. त्यावेळी लसी घेण्यासाठी प्रचंड रांगा लागणार आहेत. कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतरही लस उपलब्ध झाली नाही, तर गोंधळाची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

आकडे बोलतात...

-४५ वर्षांवरील लसीकरणाचे लाभार्थी : १४ लाख २२ हजार

-प्रत्यक्षात लस घेतलेले लाभार्थी : तीन लाख ३६ हजार

-लशींअभावी बंद लसीकरण केंद्रे : १११