esakal | मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर 
sakal

बोलून बातमी शोधा

dog

भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करून शरीराच्या विविध अंगावर चावा घेऊन गंभीर दुखापत केली. जखमींना शिवसेनेचे नेते शेख सईद शेख भिकारी यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृतीत आता सुधारणा आहे. 

मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर 

sakal_logo
By
विनोद सुरवाडे

वरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली. 
वरणगाव येथील भोगावती नदीपात्राजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ प्रजासत्ताकदिनी मध्यरात्री पादचारी गजानन धनगर (वय २७), शेख रईस शेख सकाऊद्दीन (३८), आलम राफेक कच्छी (वय १३, सर्व रा. वरणगाव) या तिघांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करून शरीराच्या विविध अंगावर चावा घेऊन गंभीर दुखापत केली. जखमींना शिवसेनेचे नेते शेख सईद शेख भिकारी यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृतीत आता सुधारणा आहे. 

गल्‍ल्‍यांमध्य नेहमीच त्रास
शहरातील गल्लीबोळांत लहान मुले खेळत असताना, तसेच रस्त्याने जाणाऱ्या आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर हे कुत्रे नेहमीच धावून जातात. कुत्रे अंगावर आल्याने नागरिक घाबरून जातात. बसस्थानकापासून गावात जाताना रात्री रामपेठ, प्रतिभानगर कॉर्नर, नदीपात्र, मटण मार्केट, स्मशानभूमी परिसर, गांधी चौक, जुनी भाजी साथ, सावकार गल्ली, मोठी होळी, रावजी बॉ परिसर, अक्सानगर, तसेच नवीन कॉलनी परिसरात २० कुत्र्यांच्या ठिकठिकाणी टोळ्या बसलेल्या असतात. यांच्याजवळून कोणी गेल्यास त्यांच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून जातात. अशा मोकाट कुत्र्यांपासून शहरातील नागरिकांना असुरक्षितता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे नेते शेख सईद शेख भिकारी यांनी हा प्रकार पालिका प्रशासनास कळविला असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 

कुत्र्यांचा बंदोबस्त करावा 
शहरात अनेक दिवसांपासून कुत्र्यांचे हल्ले करण्याच्या घटना वाढल्याने अनेक जणांना चावा घेतला आहे, असे निवेदन मुख्याधिकारी श्‍याम गोसावी यांना देण्यात आले. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष संतोष माळी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, जिल्हा युवक उपाध्यक्ष वाय. आर. पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, समाधान चौधरी, रिजवान शेख, एहसान अहमद, माजी नगराध्यक्ष अरुणाबाई इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

सभागृहात विषयाला बगल 
नगर परिषदेच्या तत्कालीन सभागृहात मागील वर्षी फेब्रुवारीच्या सर्वसाधारण बैठकीत तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, असा विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कुत्र्यांचा बंदोबस्ताचा खर्च वाजवीपेक्षा जास्त आहे आणि हा खर्च अतिरिक्त होऊ शकतो. यामुळे विरोधकांनी तो विषय नामंजूर करून धुडकावून लावला होता. या विषयावर थोडा विचार केला असता, तर तिघांवर कुत्र्यांनी हल्ला केला नसता. 

संपादन ः राजेश सोनवणे