
रस्ता चोरीला गेला आहे असे नागरीकांचे म्हणणे असून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. आपण पालिका स्तरावरून पोलिसांत चोरीसंदर्भात तक्रार द्या असे सांगीतले आहे. यामुळे चोरीला गेल्या रस्त्याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
वरणगाव (जळगाव) : शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील गणपतीनगरात सन 2019 मध्ये 34 लाख 99 हजार 413 रूपये खर्च करून 60 ते 70 मीटर कॉक्रिट रस्ता माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांच्या कार्यकाळात मंजूरी घेऊन तयार केल्याचे जाहिर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहता त्या ठिकाणी कोणताच रस्ता नसल्याचे प्रभागातील नागरीकांचे म्हणणे आहे.
रस्ता चोरीला गेला आहे असे नागरीकांचे म्हणणे असून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. आपण पालिका स्तरावरून पोलिसांत चोरीसंदर्भात तक्रार द्या असे सांगीतले आहे. यामुळे चोरीला गेल्या रस्त्याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
वरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11मधील गणपतीनगरात संदीप सरोदे यांचे घरांपासुन ते पंडित खाचणे यांचे घरांपर्यत सर्व मंजुरी घेऊन 60 ते 70 मीटर कॉंक्रीट रस्ता अंदाजीत किंमत 34 लाख 99 हजार 413 रूपये खर्च करून ७ सप्टेंबर २०१९ ला बांधकाम पूर्ण करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी जाहिर केले आहे.
तर ३५ लाखाचा भ्रष्ट्राचार
परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणताच रस्ता नसुन माजी नगराध्यक्ष काळे हे नागरीकांची दिशा भुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर या ठिकाणी पालिका दप्तरी काँक्रीट रस्ता मंजूर होऊन बांधकाम पूर्ण दाखवले जात असेल तर अक्षशः पालिकेत 35 लाखांचा मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे निष्पन्न होत आहे. याच दृष्टीकोनातून साजिद कुरेशी, सुधाकर जावळे, विनोद झोपे, पंडित खाचणे, बाळू कोलते, कालिदास चौधरी, बहादूर मिस्तरी, कुणाल भारंबे, भागवत जावळे यांनी वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शामकांत गोसावी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. परंतु सदर ठिकाणी माजी नगराध्यक्ष म्हणतात काँक्रीट रस्ता माझ्या कार्यकाळात बनवला आहे. तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी काँक्रीट रस्ताच नाही. तेथील रस्ता कोणीतरी अज्ञातांनी चोरून नेला असावा म्हणून मुख्याधिकारींनी पोलिसांत तक्रार द्यावी व योग्य त्या चौकशीची मागणी देखील केली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे