सावकारी कशी चालतेय पहा; एका तासाच्या बोलीवर कर्ज देण्याचा धंदा

विनोद सुरवाडे
Tuesday, 5 January 2021

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रभागात 52 पत्त्यातील रमी खेळ खेळण्याच्या नावाखाली व्यवसायीकांनी दहा ते पंधरा सदस्यांचा एक क्लब असे शहरात 7 ते 8 क्लब निर्माण करून जुगार खेळवला जात आहे.

वरणगाव (जळगाव) : वरणगाव शहरात गेल्या कित्तेक दिवसांपासुन जुगारांकरीता व्यसनाधीन झालेल्यांना निशाणा करून दिवसासाठीच नव्हे तर तासांच्या बोलीवर कर्ज देऊन खासगी सावकारांचा मालामाल होण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्लब व जुगाराचे अड्यांसह अशा विविध ठिकाणी सावज शोधून शिकार करणारी सावकारी प्रवृत्ती आता डोके वर काढू लागली आहे.

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रभागात 52 पत्त्यातील रमी खेळ खेळण्याच्या नावाखाली व्यवसायीकांनी दहा ते पंधरा सदस्यांचा एक क्लब असे शहरात 7 ते 8 क्लब निर्माण करून जुगार खेळवला जात आहे. प्रत्येकाला आज नाही तर उद्या डाव लागेल, दिवस पालटतील; मग सर्व देणी भागवू अशी अपेक्षा स्वतःच्या मनाशी बाळगुन जुगारात माणूस अडकतच जात आहे. महिन्याच्या पगारासह घरातील शिल्लक असलेले पैसे, ती किंमती वस्तूंपासून सर्व काही हे लोक विकून मोकळे होत आहेत.

तासाचे तीस टक्‍के अन्‌ कोरे स्‍टॅम्‍प तारण
जुगार अड्यातील व्यसनाधीनांना शोधून त्यांची शिकार करण्यासाठी खासगी सावकारांकडून एजंटचाही वापर केला जाऊ लागला आहे. असे एजंट जुगार अड्यांवर थांबून जुगार खेळणाऱ्याला दिवसासह तासांच्या बोलीवर व्याजाने कर्ज देऊन मनमानी वसुलीही करू लागले आहेत. हे सावकार जुगार, मटका अड्यासह ज्या ठिकाणी जुगार चालतो; त्या ठिकाणी ठाण मांडून बसू लागले आहेत. त्यांच्याकडून जुगार खेळणाऱ्याला गरजेनुसार दिवसाच्या किंवा तासांच्या बोलीवर 10 ते 30 टक्के अशा पद्धतीने मनमानी व्याजाने जुगार खेळण्यासाठी कर्जे दिली जातात. ते कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश तारण म्हणून घेतात. 

एक चुकी आणि कुटूंब अडचणीत
एखाद जुगारी पैसे हरला तर त्याला कर्ज देऊन खेळण्यास भाग पाडले जाते. अगर जिंकला तर त्याच्याकडून व्याजासह जागेवर वसुली केली जाते. पण कर्जदार जुगारात हरला तर तारण घेतलेल्या कागदपत्राच्या आधारे त्याची वसुली सुरू होते. जुगारात व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्या एका चुकीचा फटका त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसत आहे. दिलेल्या भक्कम अशा तारणामुळे घरची मंडळीही हैराण आहेत. परंतु या सावकारा विरोधात कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यांना चांगलेच फावत आहे.

पडद्यामागची सावकारी 
घरांतील किंमती सामान विकायचे पण जुगार खेळायचाच, अशी जुगारींची मानसिकता बनते. अशा जुगारात बुडालेली व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत अङ्क्यावर पडून असते. त्याला जुगाराचा डाव पुढे खेळण्यासाठी दिवसाच्या अगर काही तासांच्या मुदतीसाठी पैशाची गरज भासते. त्याच्या याच गरजेचा फायदा उचलून खासगी सावकार गलेलठ्ठ बनू पाहत आहेत 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news warangaon moneylender new bissness one hour loan