पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात ‘पाणीबाणी’; २२ दिवसांआड पाणी तेही दूषित 

water problem
water problem

धरणगाव (जळगाव) : उन्हाळ्याच्या सुरवातीलाच शहरात सध्या २० ते २२ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असून, तोही दूषित होत असल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. सातत्याने भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर आता नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. 
पाणीपुरवठामंत्र्यांनी किमान तीन-चार दिवसांआड व शुद्ध पाणी मिळेल, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प ‘शो पीस’ ठरत आहे. दुसरीकडे शहराला होणारा पाणीपुरवठा जेथून होतो, त्या यंत्रणेत बिघाड झाल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, बिघाड हा नित्यनेमाने होतच राहतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अशी आर्त हाक दिली जात आहे. 

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष 
धरणगाव शहराचा पाणीपुरवठा सध्या विस्कळित झाला असून, नदीपात्रातील जलवाहिनी फुटल्यामुळे जॅकवेलमध्ये गाळ साचल्याने पाणीपुरवठा दिरंगाई होत आहे, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे, तर नियोजनाचा अभाव असल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, याच पाणीप्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेचे राजकारण होत आहे. पाणीपुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असूनही मंत्री पाटील यांचे धरणगाव शहराच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. 

जलशुद्धीकरण ठरले शो-पीस 
पालिकेवर गेल्या वीस वर्षांपासून एकहाती सेनेची सत्ता आहे. मधली एक टर्म सोडली, तर गुलाबराव पाटीलदेखील वीस वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र अद्याप धरणगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही. १८६६ पासून नगर परिषद असलेल्या गावाला गेल्या दोन वर्षांपासून जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झालेला आहे. तोदेखील सध्या शो-पीस ठरलेला आहे. 

...तर काय उपयोग? 
शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था (जलवाहिनी) बदलवून टाकण्यासाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला असून, लवकरच निविदा निघणार आहे. मात्र, जेथून पाणीपुरवठा होणार आहे, त्या टाकीपर्यंत पाणी आणणारी यंत्रणाच नादुरुस्त असेल तर काय उपयोग? 

शहराला धावडा (तापी नदीकाठ) येथून पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात येते. सध्या धावडा येथील साधारण ५०० फूट जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे. गाळ साचलेला आहे. दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहराला पिंपरी येथील योजनेतून पाणीपुरवठा होत आहे. पिंपरीहून येणारे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत आणण्यासाठी जलवाहिनी नाही. त्यामुळे पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाणीपुरवठा सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. 
-नीलेश चौधरी, नगराध्यक्ष 

भर उन्हाळ्यात जलवाहिनीमध्ये गाळ साचलेला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे, ही सर्व कारणे नागरिकांना न पटणारी आहेत. या यंत्रणेची वेळीच देखभाल केली पाहिजे किंवा अशा परिस्थितीत पर्यायी नियोजन पाहिजे. पालिका प्रशासनाकडे नागरिकांच्या सोयी-सुविधांबाबत योग्य नियोजन नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 
- संजय महाजन, भाजप 

धरणगाववासीयांना किमान तीन ते चार दिवसांआड शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे, यासाठी भाजप व नगरसेवकांच्या वतीने अनेकदा निवेदने दिली गेली व आंदोलन केले गेले. परंतु सत्ताधारी व प्रशासनाच्या वेळकाढू, नियोजनशून्य व अहंकारी कारभारामुळे ते लोकांच्या पाणीच काय कोणतीही मूलभूत समस्या सोडवू शकले नाहीत. 
- कैलास माळी, गटनेता, भाजप, धरणगाव पालिका  

संपादन ः राजेश सोनवणे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com