
भुसावळ येथील २५ वर्षिय तरुणीची ‘हाईक’ ॲपद्वारे संबंधीत तरूणाशी ओळख झाली. त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना भुसावळ, जळगाव ते थेट जम्मु-काश्मिर व तेथून पुन्हा मुंबईपर्यंत जंग जंग पछाडावे लागले.
जळगाव : भुसावळ येथील तरूणी अन् मुंबईतील तरूणाची सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख, प्रेम अन् पळून जाऊन लग्नाची कहाणी अखेर हॅकरचे सहकार्य घेऊनच उघडकीस आली. मात्र, कुटूंबियांसह पोलिसांनाही जंगजंग पछाडावे लागलेल्या या कहाणीमध्ये दोघेही सुखरूप आणि मजेत असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
भुसावळ येथील २५ वर्षिय तरुणीची ‘हाईक’ ॲपद्वारे संबंधीत तरूणाशी ओळख झाली. त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना भुसावळ, जळगाव ते थेट जम्मु-काश्मिर व तेथून पुन्हा मुंबईपर्यंत जंग जंग पछाडावे लागले. त्यासाठी हॅकरचे सहकार्यही घ्यावे लागले. भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत ही तरूणी पालकांसोबत वास्तव्यास होती. तिच्या एका बहिणीचा प्रेम विवाह झालेला, तर मोठी ३५ वर्षिय बहिण अजूनही अविवाहीत. हलाखीची परिस्थिती अन् त्यातच व्यसनी भावाचा त्रास.
सोशल मिडीया वापरावर निर्बंध तरीही
अत्यंत कडक शिस्तीच्या या कुटूंबात मुलींना व्हॉटस्ॲप, फेसबुकसारख्या सोशल मिडीयाच्या वापरावर निर्बंध. तशाही परिस्थितीत तीने ‘हाईक’ या कमी वापरातील ॲपचा वापर सुरु केला. त्याद्वारे मुंबईतील मल्टीनॅशनल औषध कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणाशी तिची ओळखी झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यावेळी तिने ही संपूर्ण माहिती मुलाला सांगितली. त्यावर मुलानेही लग्नापूर्वी तिला आर्थीक मदतीचा हात दिला. स्वत: भुसावळला येवुन परिस्थिती पाहून गेला. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला अन् एके दिवशी मुलीने घर सोडले.
आई-वडीलांचा टाहो..
मुलगी बेपत्ता झाली... आई- वडीलांनी पोलिसांत तक्रार दिली... पण, मुलीकडे मोबाईल नाही. कुठल्या मैत्रीणीला, नातेवाईकांना किंवा सख्या बहिणीलाही तिने किंचीतशी भनक लागू दिली नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी ती बेपत्ता झाली. त्यामुळे, नाना शंका-कुशंका घेवून पालकांनी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळींची भेट घेतली. पालकांचे रुदन बघून त्यांनाही प्रकरण गंभीर वाटले. त्यातच मुलीचे एक नातेवाईक थेट निवृत्त महासंचालक. अशा पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुलीला शेाधुन आणण्याबाबत त्यांना आश्वस्त केले.
तपास जम्मु काश्मीर ते मुंबई
१३५ कोटी लोकसंख्येच्या या देशात समुद्रातून सुई शोधावी अशा जटील तपासाला श्री. गवळी यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील तांत्रिक तज्ज्ञ सहाय्यक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर सज्ज झाला. कुठलीच दिशा नसताना भुसावळ, जळगाव ते थेट जम्मु-काश्मीर अन् तेथून परत मुंबईपर्यंत असा तांत्रिकतज्ज्ञाचा तपास गेला आणि चक्क आधारच्या माहितीचा धागा त्यांनी धरला. मुलीच्या डोळ्यांचा रंग, हातांचे ठसे, आधार नंबर आदींची माहिती हॅकरच्या सहाय्याने शोधून काढली.
..आम्ही एक दुजे के लिए
सलग सात महिने बेपत्ता असलेल्या मुलीचा महत्प्रयासानंतर तपास लागला. गुन्हेशाखेचे पथक आई-वडीलांना घेऊन मुंबईत धडकले. पोलिस ठाण्यात समन्वय समितीसमोर मुलगीही पतीसह हजर झाली, तरीही पालकांना विश्वास बसेना. मुलीचे विचार बदलण्यासाठी तिचे चार तास समुपदेशन झाले. मात्र, ‘मला खुप चांगले सासर मिळाले आहे. नवरा चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. त्याच्याच सोबत आयुष्य घालवणार’ असे तीने ठामपणे सांगीतले. तसा लेखी जबाब पेालिसांतही दिला. त्यामुळे पालकांचा नाईलाज झाला अन् दुरुनच मुलीला आशिर्वाद देत ते माघारी परतले.
संपादन ः राजेश सोनवणे