तीन हजाराची लाच पडली महागात; यावल पंचायत समितीचे कर्मचारी ताब्‍यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून कायमस्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्चीती व उपदान मिळण्यासाठी वरीष्ठांकडे अहवाल सादर केला होता.

यावल (जळगाव) ः सेवानिवृत्त शिक्षकाला पेंशन लागू करणे व उपदान मिळण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. लाच  स्‍विकारतांना पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून कायमस्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्चीती व उपदान मिळण्यासाठी वरीष्ठांकडे अहवाल सादर केला होता. सदरचा अहवाल वरीष्ठांकडे पाठविण्यासाठी यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सिकंदर सायबु तडवी (वय ५६) यांनी काही विशिष्‍ट रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रूपयांची रक्कम देण्याचे निश्‍चित झाल्‍यानंतर आज ती रक्‍कम घेवून सेवानिवृत्‍त शिक्षक गेले. या दरम्‍यान तीन हजार रूपयांची लाच स्विकारतांना संशयित आरोपी सिकंदर तडवी याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. सदर कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक ठाकूर, पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव,  सफौ रविंद्र माळी,पोहेकॉ अशोक अहीरे आदींनी केली.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news yawal panchayat samiti lcb arrest lach