बटाटा शेती ठरतेय वरदान; खडकदेवळाच्या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी !

चंद्रकांत चौधरी
Tuesday, 15 December 2020

पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून तसेच बटाटा उत्पादना संदर्भात व बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी नवीन वाट शोधत बटाट्याची लागवड केली.

पाचोरा : पावसाचा लहरीपणा, वाढती रोगराई, मजुरांची चणचण,वाढती मजूरी, महागडी जंतुनाशक फवारणी, शेतीमालाला हमीभावाचा अभाव अशा विविधांगी कारणांमुळे शेती व्यवसाय संकटात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना वाढत आहे. पारंपारिक पीकपद्धतीत बदल करून नवनवीन पिके व तंत्रज्ञान आत्मसात करून शेती उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न ही पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने शेतकऱ्यां पुढील समस्या कमी होण्याऐवजी त्या दिवसागणिक वाढत आहेत. असे असताना कमी वेळेत भरघोस उत्पादन देणाऱ्या बटाटा पिकाची शेती दिलासादायी व फायदेशीर पर्याय असल्याची साक्ष खडकदेवळा ( ता. पाचोरा) येथील शेतकरी गजानन मंगरूळे यांनी पटवून दिली असून शेतकऱ्यांनी तीन महिन्यात हाती येणाऱ्या बटाटा उत्पादनाकडे वळावे असे आवाहन केले आहे.

आवश्य वाचा- घरात लग्नाची तयारी सुरू आणि वधू घरातील पैसे घेवून पसार -

खडकदेवळा येथील गजानन मंगरुळे यांचेकडे 15 एकर शेती असून त्यापैकी 3 एकरात त्यांनी या वर्षी बटाटा लागवड केली. पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून तसेच बटाटा उत्पादना संदर्भात व बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी नवीन वाट शोधत बटाट्याची लागवड केली. ते आपल्या शेतीत कापूस, मका ,ज्वारी ,बाजरी अशी पारंपरिक पिके गेल्या अनेक वर्षापासून घेत असत. बटाटा लागवडीसाठी त्यांनी शेतीत शास्रोक्त पद्धतीने खांदणी तयार केली. पाण्याचे योग्य ते नियोजन करून बटाटा लागवड केली. लागवडीकेल्यावर तिसऱ्या आठवड्यात पिक डोलू लागल्यानंतर नियोजनबद्धरीत्या पाणी दिले. लागवडीस दीड महिना झाला असून तीन महिन्यात बटाट्याचे उत्पादन हाती येणार आहे .एकरी 7 क्विंटल प्रमाणे 21 क्विंटल बेणे बाहेरगावाहून आणून आतापर्यंत त्यांना सुमारे 40 हजारापर्यंतचा खर्च लागला आहे आणखी 20 हजारापर्यंतचा खर्च अपेक्षित धरला तरी या बटाटा उत्पादनातून एकरी 125 क्विंटल प्रमाणे उत्पादन निघण्याची अपेक्षा असून त्यातून लाखोंचे उत्पादन हाती येणार आहे.

आवर्जून वाचा- शिवभोजन केंद्राच्या ७५ थाळ्या कमी होणार; काय आहे कारण वाचा 

विशेष म्हणजे बटाटा उत्पादन शेतीसाठी निंदणीचा खर्च लागत नाही तणनाशकाचा वापर करावा लागत असल्याने त्याचा व मजुरीचा खर्चही जास्त लागत नाही. तसेच तीन महिन्यानंतर बटाटा पीक हाती येत असले तरी बाजारभावानुसार ते काढता येते. अन्यथा ते जमिनीत वाढत राहते. योग्य बाजार भाव पाहून त्याची काढणी करता येते .आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना बटाटा शेती फायदेशीर पर्याय असून त्यातून कमी वेळेत भरघोस उत्पन्न घेणे शक्य असल्याचा विश्वास गजानन मंगरूळे यांनी व्यक्त केला. 

 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi new pachora cultivating potatoes in times of crisis took lot of income farmer