आषाढी वारी : संत मुक्ताबाई पादुकांचे होणार प्रस्थान; इन्सीडेंट कमांडर असणार सोबत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी येथून 311 वर्षांची परंपरेने जाणारी संत मुक्ताबाई पालखी सोहळा श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) या पालखीचा समावेश आहे. संत मुक्ताबाई पादुका घेवून परत प्रस्थानाच्या मुळ ठिकाणी सुरक्षित येतील. याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली

मुक्ताईनगर : आषाढीची वारी पंढरपूरला जावून भाविक एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनात लिन होत असतात. यात जिल्ह्यातून जाणारी संत मुक्‍ताबाई पादुकांची पालखी देखील जात असते. कोरोनामुळे यावर ठरलेल्या परंपरेनुसार निर्बंध आले असले, तरी दशमीच्या दिवशी पालखीचे प्रस्थान होणार आहे. याकरीता इन्सीडेंट कमांडरची नेमणुक करण्यात आली असून, त्यांच्या निगराणीत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. 
आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रातिनिधीक स्वरुपात काही महत्त्वाच्या मानाच्या नऊ संतांच्या पादुका परंपरेने "विठ्ठल- रुक्‍मणी'च्या भेटीस जातात. त्या मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी किंवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 30 जूनला श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी शासनाने परवानगी देण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी येथून 311 वर्षांची परंपरेने जाणारी संत मुक्ताबाई पालखी सोहळा श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) या पालखीचा समावेश आहे. संत मुक्ताबाई पादुका घेवून परत प्रस्थानाच्या मुळ ठिकाणी सुरक्षित येतील. याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासनाने वायरलेस व्हॅन उपनिरीक्षकासह पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. संत मुक्ताबाई पादूका सोहळ्यासोबत मुक्ताईनगर येथील महसुल नायब तहसिलदार पी. एम. पानपाटील यांची इन्सीडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

नऊ पालख्यांमध्ये समावेश 
दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखीसोबत पंढरपूर येथे जातात. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालणेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरीकांना व जनतेला होऊ नये; यासाठी पायी- पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर, श्री संत एकनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र पैठण, माता रूख्मिणी संस्थान श्रीक्षेत्र कौंडण्यपूर, श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र सासवड या नऊ संतांचे पादूकांसोबत मर्यादीत वारकरी समवेत जाण्यास इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहेत. 

मार्गाचे होणार नियोजन 
इन्सीडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत संत मुक्ताबाई पालखी सोबत राहतील. संबंधित अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्‍चित करावा. सदर पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे रात्री अकरापर्यंत पोहचतील. याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासा दरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणाऱ्या सर्व व्यक्तींनी कोरोना चाचणी करणे, मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aashadhi vari muktai palkhi going pandharpur insidend commonder