esakal |  अन तो कमी वयातच...सैन्य दलात बनला लेफ्टनंट
sakal

बोलून बातमी शोधा

leftnant prathmesh

तीन वर्षाचे खडतर साहसी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देहरादून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमी येथे एका वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. नुकत्याच पार पडलेल्या पासिंग आऊट परेड नंतर सिंहगड कंपनीचा कॅडेट म्हणून प्रथमेश ने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दोन सन्मानचिन्ह प्रदान करून समारंभपूर्वक गौरवण्यात आले.

 अन तो कमी वयातच...सैन्य दलात बनला लेफ्टनंट

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर- मनात जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करण्याची सकारात्मक मनोवृत्ती असेल तर या जगात काहीच अशक्य नाही हे मेहरगाव (ता. अमळनेर) येथील रहिवासी प्रथमेश प्रवीण पाटील याने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  तो उद्या (ता.15) आसाम येथील सिलिगुडी येथे लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहे. अतिशय कमी वयात अर्थात वयाच्या  22 व्या वर्षी मिळवलेले यश हे सैन्य दलात जाणाऱ्या तरुणांसाठी "रोल मॉडेल" ठरणार आहे.

प्रथमेश पाटील याने देहरादून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमी येथे एका वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच्या या कामगिरीमुळे तो भारत मातेच्या सेवेसाठी सज्ज होणार असून त्याने खान्देशचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. प्रथमेश हा एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे येथे दाखल झाला. त्याने तीन वर्षाचे खडतर साहसी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देहरादून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमी येथे एका वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. नुकत्याच पार पडलेल्या पासिंग आऊट परेड नंतर सिंहगड कंपनीचा कॅडेट म्हणून प्रथमेश ने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दोन सन्मानचिन्ह प्रदान करून समारंभपूर्वक गौरवण्यात आले.  

प्रथमेश पाटील हा लहानपणापासूनच हुशार बुद्धिमत्तेचा आहे. प्राथमिक शिक्षण हे मेहरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाले. माध्यमिक शिक्षण हे येथील साने गुरुजी विद्यालयात झाले. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणे माध्यमिक शिक्षणात प्रथमेशने चुणूक दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी तो एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपाला आला. उत्तम क्रिकेटर म्हणून नाव मिळवले. इयत्ता दहावी त्याने 95 टक्के गुण मिळवून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. दरम्यानच्या काळात प्रथमेशचा मन मिळवू स्वभाव व हुशारी पाहून शाळेतील शिक्षकांनी व आई वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार केले. तसेच शाळेतील शिक्षक डी ए धनगर व मुख्याध्यापक एस डी देशमुख यांनी त्याला भारतीय सैन्य दला विषयी माहिती दिली, त्याला ती मनापासून आवडली व त्याने मनाशी सैन्यदलात अधिकारी होण्याचा दृढनिश्चय केला. त्यासाठी दहावी पास झाल्यानंतर त्याने औरंगाबाद येथील सैनिकी पूर्व सेवा संस्था अर्थात एसपीआय येथे प्रवेश मिळवला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सीबीएससी पॅटर्न च्या अभ्यासक्रमात प्रथमेशचा प्रवेश झाला. तेथे यूपीएससीची तयारी करू लागला.  ध्येयाने झपाटलेला प्रथमेश बारावी उत्तीर्ण होऊन यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे अर्थात एनडीए मध्ये दाखल झाला. त्याने तीन वर्षाचे खडतर साहसी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देहरादून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमी येथे एका वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आता तो आसाम येथील सिलिगुडी येथे  लेफ्टनंट म्हणून रुजू होणार आहे.

अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव येथील रहिवासी व जानवे ज्युनिअर कॉलेजचे प्रा. प्रवीण श्रीधर पाटील यांचा तो मुलगा असून म्हसावद येथील प्रा कैलास चव्हाण यांचा भाचा आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा माजी आमदार गुलाबराव पाटील, अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक एस डी देशमुख, मेहरगाव येथील घनश्याम पाटील आदींनी कौतुक केले आहे. 

भविष्यातही अधिकारी घडतील
सैन्यदलात मराठी अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा या उदात्त हेतूने राज्य शासनाने 1996 मध्ये प्रत्येक जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खानदेशातही जळगाव, धुळे, नंदुरबार येथे ही या सैनिकी शाळा सुरू झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी 2003 मध्ये अमळनेर येथे विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेज ची स्थापना केली. या शाळांमध्ये एनडीए ची पूर्वतयारी केली जाते. प्रथमेश पाटील हे सैन्य दलात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्याने देश पातळीवर अमळनेर चा  गौरव झाला आहे. त्यांच्या या ज्ञानाचा या सैनिकी शाळेमध्ये उपयोग होणार आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश पाटील यांनी आर्मी स्कूल च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनही केले होते. यामुळे भविष्यातही अनेक अधिकारी घडतील असा मानस प्रथमेश पाटील यांनी 'दै.सकाळ'शी बोलताना सांगितला