अतिवृष्टीमुळे बाधित वीस गावातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी अनुदान 

उमेश काटे
Tuesday, 8 December 2020

जुलै 2019 मधील अतिवृष्टीमुळे बाधित 20 गावांसाठी 5 कोटी अनुदान प्राप्त झाले असून सप्टेंबर 2019 मध्ये बाधित झालेल्या 30 गावातील शेतकऱ्यांचे अनुदान अजून प्राप्त व्हायचे आहे,प्राप्त 5 कोटी अनुदान लवकरच शेतकऱ्यांना वितरित केले जाईल.

- मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, अमळनेर.

अमळनेर (जळगाव) : गेल्या वर्षी जुलै 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या वीस गावातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी अनुदान प्राप्त झाले असून शासन दरबारी पाठपुराव्याचे हे पहिले यश आहे. याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपुर्ण 52 गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण 12 कोटी अनुदान मिळून शंभर टक्के न्याय मिळेल; अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.
अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर रुंधाटी, मुंगसे, मठगव्हान, नालखेडा, गंगापुरी, दापोरी खुर्द, खापरखेडा प्र.ज, पातोंडा, बोहरा, कळमसरे, धावडे, सावखेडा, निम, जळोद, पाडळसरे आदी 15 गावातील शेतकरी नियमित कर्जदार असल्याने त्यांना अनुदानाऐवजी जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. 

३२ गावे दुसऱ्या टप्प्यात
अनुदान प्राप्त झालेले 20 गावातील शेतकरी जुलै 2019 च्या अतिवृष्टीत बांधीत (नुकसानग्रस्त) झाले होते, तर सप्टेंबर 2019 मध्ये 32 गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. महसूल विभागामार्फत एकूण 52 गावांचा नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर या संपूर्ण 52 गावातील शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पाटील यांचे शासन दरबारी प्रयत्न सुरू होते. अखेर शासनाने यास मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात जुलै 2019 च्या अतिवृष्टीतील 20 गावांसाठी 5 कोटी अनुदान प्राप्त झाले असून उर्वरित 32 गावातील शेतकऱ्यांना देखील लवकरच सात कोटी रुपये अनुदान प्राप्त होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
शासनाच्या निकषानुसार बिगर कर्जदार म्हणजेच ज्यांनी पीक कर्ज घेतले नसेल किंवा थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांचा अनुदानात समावेश असून त्यांना एक हेक्टरपर्यंत 20 हजार 400 याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असेल म्हणजे नियमित कर्जदार असतील त्यांना सहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत एक हेक्टरपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. दरम्यान संपूर्ण 52 गावातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल कोणत्याही मार्गाने मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक असून आपण अनेक महिन्यापासून अतिशय जोमाने यासाठी पाठपुरावा करीत होतो. आज 20 गावांना न्याय मिळाल्याने हे पहिले यश आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner affected by heavy rains twenty villages five carrore fund