मनुष्यबळाअभावी कृषी योजनांची चालढकल 

किशोर पाटील
Sunday, 11 October 2020

कृषी कार्यालयातील काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ६७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४४ कर्मचारी कार्यरत असून, २३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे यापुढील काळात तालुक्याचा कारभार फक्त ४४ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर असणार आहे.

वावडे (ता. अमळनेर) : तालुक्यातील कृषी विभाग कर्मचाऱ्यांअभावी ‘सलाईन’वर असल्याचे चित्र आहे. मंजूर ६७ पदांपैकी केवळ ४४ कर्मचाऱ्यांवर कार्यालयाचा कारभार सुरू असून, तब्बल २३ पदे रिक्त आहेत. यात महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे शासनाच्या कालमर्यादित कामावर त्याचा परिणाम होत आहे. योजना राबविल्या जात नसल्याने अनुदान परत जाण्याच्या मार्गावर आहे. 
अमळनेर तालुका कृषी कार्यालयातील काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ६७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४४ कर्मचारी कार्यरत असून, २३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे यापुढील काळात तालुक्याचा कारभार फक्त ४४ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर असणार आहे. कार्यालयात सहाय्यक अधीक्षक, कृषी सहाय्यक आठ, चार अनुरेखक, एक वाहनचालक व इतर अशी एकूण २३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासनाच्या कृषीविषयक अनेक महत्त्वाकांक्षी योजनांवर पाणी फिरले आहे. मोजक्याच कृषी सहय्यकांच्या भरवशावर कृषी विभागाचा कारभार चालवला जात असल्याने एका कृषी सहाय्यकाकडे सात ते आठ गावांचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात येत आहे. त्याचा परिणाम थेट त्यांच्या मूळ कामावर होत आहे. परिणामी, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. मनुष्यबळ कमी असल्याने शासनाच्या योजनेचा प्रचार व प्रसार होत नाही. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे कृत्रिम आपत्तीमध्ये तालुक्यातील शेतकरी अडकला आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

अमळनेर तालुक्यातील मंजूर व रिक्त पदे 
संवर्ग--------------मंजूर पदे-----भरलेली पदे------रिक्त पदे 
तालुका कृषी अधिकारी--१-----------१-------------० 
कृषी अधिकारी---------४-----------३-------------१ 
कृषी पर्यवेक्षक---------७------------२------------५ 
सहाय्यक अधीक्षक-----१------------१------------० 
वरिष्ठ लिपिक----------१------------१------------० 
लिपिक---------------४------------२------------२ 
अनुरेखक-------------५------------१------------४ 
कृषी सहाय्यक---------३७-----------२९-----------८ 
वाहनचालक----------०१------------००----------०१ 
शिपाई---------------०६-------------०४----------०२ 
एकूण----------------६७-------------४४----------२३ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner agriculture department vacancy