esakal | अरेच्चा; दोन वर्षांपासून विनापरवानगी वाहतूक वळवली, कारवाईचा झाला ठराव !
sakal

बोलून बातमी शोधा

अरेच्चा; दोन वर्षांपासून विनापरवानगी वाहतूक वळवली, कारवाईचा झाला ठराव !

आता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावेत व ठेकेदारावर कारवाई करावी असा ठरावच पालिकेने संमत केला आहे.

अरेच्चा; दोन वर्षांपासून विनापरवानगी वाहतूक वळवली, कारवाईचा झाला ठराव !

sakal_logo
By
योगेश महाजन

अमळनेर : राज्य मार्गावर रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र, पालिकेची परवानगी न घेता गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. परिणामी पालिका हद्दीतील रस्त्यांची वाट लागली आहे. याबाबत पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग व धुळे येथील ठेकेदारविरुद्ध चक्क कारवाईचा ठराव मंजूर करून कार्यवाहीची मागणी केली आहे.

आवश्य वाचा- वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा ! -

याबाबत नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पाकिकेची नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात ठळक मुद्दा पालिका हद्दीतील रस्त्यांचा उपस्थित झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून राज्य मार्ग 15 व सहावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेस कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच परवानगी न घेता अवजड वाहतूक पालिका हद्दीतील रस्त्यावरून वळवली आहे. परिणामी या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने व ठेकेदारानेच हे रस्ते दुरुस्त करून प्रवाशांना दिलासा द्यावा. या रस्ते दुरावस्थेस तेच जबाबदार आहेत.  हा विषय सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला असून प्रमुख मुद्दा बनला आहे. याबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय कार्यवाही करते याकडे लक्ष लागून आहे. 


रस्त्याची कामे कासवगतीने
चोपडा, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांच्या तुलनेत अमळनेर तालुक्यातील रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. परिणामी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक अपघात होत असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

वाचा- बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव; हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त !

दगडी दरवाजाचे काम सुरू
शहरातून जाणाऱ्या मार्गावर ऐतिहासिक दगडी दरवाजा (वेस) आहे. या दरवाजाचे काम पालिकेने आता सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतुकीसाठी काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, पालिका हद्दीतील पर्यायी रस्त्यावरून अवजड वाहतूक वळविण्यात आल्याने रस्त्यांची दैना झाली आहे. या रस्त्यावर वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावेत व ठेकेदारावर कारवाई करावी असा ठरावच पालिकेने संमत केला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे