अमळनेरात होणार रॅपिड अँटीजन टेस्टिंग...अर्धा तासातच कोरोनाचे निदान

उमेश काटे
Tuesday, 14 July 2020

अवघ्या अर्ध्या तासातच कोरोनाचे निदान होणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच केंद्र कार्यान्वित झाले असून आता प्रत्येक तालुक्यावर अशी केंद्र स्थापित होणार आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड कमी होणार आहे. 

अमळनेर : कोरोनाच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागावा. यासाठी स्वॅब तपासण्याची प्रक्रिया गतिमान होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली (आयसीएमआर) ने येथील प्रताप महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला "कोविड रॅपिड अँटीजन टेस्टिंग सेंटर"ची मान्यता दिली आहे. यामुळे अवघ्या अर्ध्या तासातच कोरोनाचे निदान होणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच केंद्र कार्यान्वित झाले असून आता प्रत्येक तालुक्यावर अशी केंद्र स्थापित होणार आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड कमी होणार आहे. 

जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर मार्च महिन्यात जिल्हा ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल करत होता. त्याच वेळी अमळनेर तालुक्यात मुंगसे येथील 60 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळल्या. त्यामुळे यंत्रणा जागृत झाली. त्यानंतर तालुक्यात सातत्याने रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात अमळनेर तालुका चांगलाच चर्चेत आला होता. तालुक्यातील कोरोनाचा साखळी तुटावी; या हेतूने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, हृदयरोग तज्ञ डॉ. संदीप जोशी व डॉ. आशिष पाटील यांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदकडे नोंदणी करून प्रस्ताव पाठवला. कागदपत्राचा योग्य पाठपुरावा केल्याने अवघ्या तीनच दिवसात रॅपिड अँटीजन टेस्टिंग सेंटर"ला मान्यता मिळाली. म्हणूनच सद्यस्थितीत राज्य शासनाने 200 रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे किट उपलब्ध करून दिले आहेत. 

प्रयोगशाळेत टेस्‍टची गरज नाही
किटमधून प्रताप महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे टेस्टिंग केले जाणार आहे. यामुळे संस्थात्मक विलगीकरण करण्यास मदत होणार असून निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना तात्काळ घरी जाता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले रुग्णांचे स्वॅब उशिराने येत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढत होती. वाढत्या संख्येला ब्रेक लागावा यासाठी ही टेस्ट उपयोगात येणार आहे. हे सेंटर मिळाल्याने येथील जास्तीचे अहवाल आता जिल्ह्याच्या ठिकाणी प्रयोगशाळेत पाठवण्याची गरज नाही. आधीच्या टेस्ट दरम्यान कोविड सेंटरमधील रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. त्यांची देखभाल आदीसाठी वेळ आणि पैसा खर्च होत होता. आता केवळ पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. निगेटिव्ह रुग्ण तात्काळ घरी जाणार असल्याने कोविड सेंटरला होणारी आता गर्दी टळणार आहे. ग्रामीण रुग्णालयात पूर्वीप्रमाणेच 'आरटीपीसीआर' पध्दतीने तपासणी होणार आहे. 

काय आहे रॅपिड अँटीजन टेस्ट
नेहमीप्रमाणे रुग्णांचे स्वॅब 'आरटीपीसीआर' टेस्ट करून घेतले जात होते. त्याचे अहवाल जळगाव किंवा धुळे प्रयोग शाळेत पाठवावे लागत होते व अहवाल मिळण्यास दोन- तीन दिवस लागत होते. मात्र रॅपिड अँटीजन टेस्ट किटमुळे अवघ्या अर्ध्या तासात स्वॅबचा अहवाल प्राप्त होणार आहे. 

31 अहवाल मिळाले तात्काळ
प्रायोगिक तत्त्वावर रॅपिड अँटीजन टेस्टने सोमवारी सहा जणांची चाचणी करण्यात आली. त्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर चार निगेटिव्ह आले. आज खऱ्या अर्थाने हे केंद्र कार्यान्वित झाले. आज (ता.14) 25 जणांची रॅपिड अँटीजन टेस्टने चाचणी करण्यात आली. त्यात 4 रुग्ण पॉझिटिव्ह तर 21 निगेटिव्ह आल्‍याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे यांनी दिली. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner corona rapid antigen testing half and hour report