दिलासादायक : ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या अमळनेरात रुग्ण नसल्याने कोविड सेंटर बंद !

उमेश काटे
Saturday, 24 October 2020

‘हॉटस्पॉट’ ठरल्याने अमळनेरमध्ये जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर उभारण्यात आले. त्या काळात अल्प वेळेत असे सेंटर सुरू करून प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने अत्यंत जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडले. 

अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ‘कोरोना’बाधित रुग्णसंख्या नगण्य झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रताप महाविद्यालयात सुरू असलेले कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहे. 

आवश्य वाचा- डाॅक्टरांना देखील हवी शस्त्र वापरण्याची परवानगी !

तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपूर्वी कोविडचे रुग्ण वाढू लागल्यामुळे २७ एप्रिलला प्रताप महाविद्यालयात डॉ. प्रकाश ताळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. या काळात येथे १ हजार ६३१ पॉझिटिव्ह रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात असून, १ हजार ७३५ आरटी-पीसीआर स्वॅब घेण्यात आले. तसेच ४ हजार २२८ रॅपिड एन्टिजेन टेस्टिंग झाल्या, त्यात ८५० लोक पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

सुरवातीच्या काळात ‘हॉटस्पॉट’ ठरल्याने अमळनेरमध्ये जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर उभारण्यात आले. त्या वेळी या आजाराविषयी अत्यंत कमी माहिती होती. त्या काळात अल्प वेळेत असे सेंटर सुरू करून प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने अत्यंत जबाबदारीने आपली कर्तबगारी दाखवून दिली. प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, डॉ प्रकाश ताळे, डॉ. संदीप जोशी, डॉ. आशिष पाटील, डॉ. गिरीश गोसावी, डॉ. राजेंद्र शेलकर, डॉ. विलास महाजन, आरोग्य कर्मचारी, पालिकेचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, स्वॅब घेण्यासाठी वालंटियर सहकार्य केले. सद्य:स्थितीत रुग्ण नसल्यामुळे शुक्रवारी कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले. 

सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे  
भविष्यात जर कोरोनाची दुसरी लाट आलीच तर सर्वजण तत्परतेने सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. कोरोना पूर्णपणे गेला असे न समजता भविष्यात तो पुन्हा येणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही प्रशासनाने सांगितले.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner Covid Center in amalnera is temporarily closed due to lack of corona