esakal | कोरोनाच्या भितीने कोविड सेंटरमधून झाला गायब...पण त्याला मृत्यूने गाठलेच 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking

कोविड सेंटरमध्ये संशयीत म्हणून दाखल केल्यानंतर त्याचे स्वॅब घेण्यात आले. पण कोरोना पॉझिटीव्ह येण्याची भिती होती. या भितीने अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल असताना 60 वर्षीय इसमाने पलायन केले होते.

कोरोनाच्या भितीने कोविड सेंटरमधून झाला गायब...पण त्याला मृत्यूने गाठलेच 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर ः प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधून "स्वॅब' देण्यासाठी दाखल झालेला 60 वर्षीय संशयित रुग्ण तीन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर साऱ्यांचीच धावपळ उडाली. कोरोनाच्या भितीने हा संशयीत रूग्ण कोविड सेंटरमधून गायब झाला खरा...पण त्याला मृत्यूने गाठलेच. 
कोरोना व्हायरसने साऱ्यांना भयभीत करून सोडले आहे. नुसती सर्दी, खोकला झाला तरी मनात कोरोनाची भिती असते. यात लक्षण आढळून आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये संशयीत म्हणून दाखल केल्यानंतर त्याचे स्वॅब घेण्यात आले. पण कोरोना पॉझिटीव्ह येण्याची भिती होती. या भितीने अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल असताना 60 वर्षीय इसमाने पलायन केले होते. दरम्यान, यापूर्वी जळगाव व धुळे येथील कोविड सेंटरमधून अशाच रुग्ण बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. 

कुटूंबातील सदस्यही होते दाखल 
अमळनेरमधील ब्रह्मे गल्लीतील 42 वर्षीय प्रौढासह त्यांची पत्नी व मुलगा यांना 6 जुलैला कोविड सेंटरला दाखल केले होते. त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता ते व मुलगा निगेटिव्ह आले होते. म्हणून त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, परिवारातील साठवर्षीय काका बापू निंबा वाणी हे हमाली कामासाठी बाहेर गेलेले होते; म्हणून त्यांचा स्वॅब घेण्यात आला नव्हता. पालिकेमधून त्यांना वारंवार काकांचा स्वॅब घेण्यासाठी कोविड सेंटरला आणा म्हणून फोन येत होता. 

अखेर पुतण्याने त्यांना आणले पण 
त्यांच्या पुतण्याने 9 जुलैला काकांना कोविड सेंटरला दाखल करून त्यांची नोंदणी करीत खोली क्रमांक 66 मध्ये बसवून आले होते. त्यानंतर पुतण्या 11 जुलैला काकांची विचारपूस करायला गेला असता, त्या दिवशी दुपारपासून काकाच नसल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत पुतण्याने विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे दिली गेलीत. प्रशासन उत्तरे नीट देत नसल्याने त्यांनी माजी आमदार स्मिता वाघ यांच्याकडे लेखी तक्रार दिली. यानंतर बेपत्ता व्यक्तीची शोधाशोध सुरू झाली आहे. 

आणि त्यांचा मृतदेह सापडला 
कोविड सेंटरमधून गायब झालेल्या बापू वाणी यांचा शोध घेण्यासाठी दोन पथक कार्यरत करण्यात आले होते. याशिवाय सदर व्यक्‍तीचा फोटा व्हॉटस्‌ऍपवर शेअर करून माहिती कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. दरम्यान विचखेडा (ता. पारोळा) येथे बापू वाणी यांचे अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला नोंद झाल्यानंतर नातेवाईकांनी ओळख पटविण्यात आली.