कळमसरेत शॉटसर्किटने ज्वारीची कणसे जळून खाक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

कळमसरे येथील शेतशिवारातील गट क्रमांक ४५० मधील सुमारे अडीच बिघे शेती क्षेत्रात ज्वारीची पेरणी शशिकांत बडगुजर यांनी केली होती. त्यांनी पीक कापणीवर आल्याने ज्वारीच्या कणसांचा ढिगारा शेतात एका ठिकाणी जमा करून ते उद्या काढणार होते.

कळमसरे (जळगाव) : कळमसरे (ता. अमळनेर) येथील शेतशिवारात शेतकरी शशिकांत बडगुजर यांच्या शेतातील ज्वारीच्या कणसाच्या ढिगाऱ्याला सोमवारी (ता. २) सायंकाळी वीजतारांचे शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यात अडीच बिघे शेतातील ज्वारीच्या कणसांची डोळ्यासमोर राख झाल्याने शेतकरी बडगुजर यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 
कळमसरे येथील शेतशिवारातील गट क्रमांक ४५० मधील सुमारे अडीच बिघे शेती क्षेत्रात ज्वारीची पेरणी शशिकांत बडगुजर यांनी केली होती. त्यांनी पीक कापणीवर आल्याने ज्वारीच्या कणसांचा ढिगारा शेतात एका ठिकाणी जमा करून ते उद्या काढणार होते. मात्र, सोमवारी सायंकाळी त्यांच्या शेतातून गेलेल्या वीजखांबावरील लोंबकळत असलेल्या तारांचे अचानक शॉर्टसर्किट झाल्याने जमा करून ठेवलेल्या ज्वारीच्या कणसांना आग लागल्याने कोरडेठाक झालेल्या कणसांनी पेट घेतला. शशिकांत बडगुजर व शेजारील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र, डोळ्यासमोर ज्वारीच्या कणसांची राख झाल्याने सुमारे ३५ ते ४० हजारांचे नुकसान झाल्याने शेतकरी बडगुजर यांना अश्रू अनावर झाले होते. यामुळे त्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. 

लोंबकळणाऱ्या वीजतारा धोकादायक 
गावासह परिसरात बऱ्याच ठिकाणी वीजखांबांवरील लोंबकळणाऱ्या तारा नजरेस पडत असूनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र कानाडोळा करीत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असून, लोंबकळणाऱ्या तारांना सरळ करून शॉर्टसर्किटसारखे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशीही मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner farmer jawar fire in shortcircit