गुटखाकिंगकडून पाच लाखांचा गुटखा जप्त

योगेश महाजन
Sunday, 11 October 2020

आधीही गुटखाप्रकरणी कारवाई झाली आहे. पण या वेळी त्याच्या घरात तब्बल ५ लाख १५ हजार १२० रुपयांचा गुटखा आढळून आला.

अमळनेर (जळगाव) : चोपडा रस्त्यावरील मंगळनगरातील ‘गुटखाकिंग’ गोकुळ जगन्नाथ पाटील याच्या घरात पोलिसांनी छापा टाकून पाच लाखांचा गुटखा जप्त केला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. १०) मध्यरात्री दोनला ही कारवाई केली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित गोकुळ पाटील याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
या कारवाईत घरातच पथकाला विमल गुटख्याचे दोन पोते, सागर गुटख्याचे दहा पोते आणि मिराजचे ४ बॉक्स मिळून आले. त्याची बाजारभावानुसार ५ लाख १५ हजार १२० रुपये किंमत आहे. गोकुळ पाटील या गुटख्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सर्व माल जप्त केला. यामुळे मोठे गुटखा रॅकेट उघड होण्याची शक्यताही पोलिसानी वर्तवली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील ही सर्वाधिक मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी गोकुळ पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल लबडे तपास करीत आहेत. 

...या पथकाची कारवाई 
जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, सुनील पाटील, मनोज दुसाने, दीपक शिंदे, परेश महाजन आणि चालक प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

विक्रेत्यांचे धाबे दणाणले 
गोकूळ पाटील याच्यावर या आधीही गुटखाप्रकरणी कारवाई झाली आहे. पण या वेळी त्याच्या घरात तब्बल ५ लाख १५ हजार १२० रुपयांचा गुटखा आढळून आला. त्यामुळे ऐवढा मोठा साठा त्याने कुठून आणला? याचा तपास पोलिसांना आव्हान देणारा आहे. या कारवाईने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner lcb action five lakh gutkha seized