
महसूल विभागामार्फत एकूण 52 गावांचा नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.
अमळनेर : गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या २० गावातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी अनुदान प्राप्त झाले असून शासन दरबारी पाठपुराव्याचे हे पहिले यश आहे, याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपूर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी अनुदान मिळून १०० टक्के न्याय मिळेल, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
आवश्य वाचा- कापुस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई
अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुंधाटी, मुंगसे, मठगव्हान, नालखेडा, गंगापुरी, दापोरी खुर्द, खापरखेडा प्र.ज, पातोंडा, बोहरा, कळमसरे, धावडे, सावखेडा, निम, जळोद, पाडळसरे आदी १५ गावातील शेतकरी नियमित कर्जदार असल्याने त्यांना अनुदानाऐवजी जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. आता अनुदान प्राप्त झालेले २० गावातील शेतकरी जुलै २०१९ च्या अतिवृष्टीत बाधीत (नुकसानग्रस्त) झाले होते, तर सप्टेंबर २०१९ मध्ये ३२ गावातील शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते, महसूल विभागामार्फत एकूण 52 गावांचा नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, त्यानंतर या संपूर्ण ५२ गावातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार अनिल पाटील यांचे शासन दरबारी सतत प्रयत्न सुरू होते.
कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
शासनाच्या निकषानुसार बिगर कर्जदार म्हणजेच ज्यांनी पीक कर्ज घेतले नसेल किंवा थकबाकीदार असतील, अशा शेतकऱ्यांचा अनुदानात समावेश असून त्यांना एक हेक्टरपर्यंत २० हजार ४०० याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असेल म्हणजे नियमित कर्जदार असतील त्यांना साहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयामार्फत एक हेक्टरपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
वाचा- बीएचआर घोटाळा: राज्यभरातील सात खटल्यांचे कामकाज जळगावात
जुलै २०१९ मधील अतिवृष्टीमुळे बाधित २० गावांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले असून सप्टेंबर २०१९ मध्ये बाधित झालेल्या ३० गावातील शेतकऱ्यांचे अनुदान अजून प्राप्त व्हायचे आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे