सर्व शिक्षकांची कोविड चाचणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाचीच !

उमेश काटे
Tuesday, 17 November 2020

राज्य खासगी शिक्षण संस्था महामंडळ तसेच संबधित शाळांनी याबाबत शासनाकडे बोट दाखविले होते. यावर काय निर्णय होणार, याची उत्सुकता होती.

अमळनेर :  नववी ते बारावी या वर्गांची शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांची कोरोनाची "आरटीपीसीआर" कोविड चाचणी व आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. या सर्व सुविधा तातडीने शाळांना पुरविण्यात याव्यात, असे निर्देश अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी मंगळवारी दिले आहेत.

आवश्य वाचा- पोलिसांपासून लपण्यासाठी स्मशानभूमीत झोपला आणि काळाने त्याला दंश केला -

राज्यात "मिशन बिगिन" अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्या - टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत.  या पार्श्वभूमीवर राज्यातील ९ वी ते १२ वी चे वर्ग सोमवार पासून (ता. २३) सुरू करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली होती, मात्र सर्व शिक्षकांच्या 'आरटीपीसीआर' टेस्टचा खर्च आणि शाळांमधील थर्मल स्क्रिनिंग, ऑक्‍सिमीटर मशिनचा खर्च, शाळा निर्जंतकीकरण , स्वच्छता, सनिटायझर खर्च कोणी करायचा हा नवा प्रश्‍न निर्माण झाला होता.

राज्य खासगी शिक्षण संस्था महामंडळ तसेच संबधित शाळांनी याबाबत शासनाकडे बोट दाखविले होते. यावर काय निर्णय होणार, याची उत्सुकता होती. अखेर प्रशासनाने आज निर्णय दिल्याने यावर पडदा पडला आहे. अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी संबधित जिल्हाचे जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रकात म्हतले आहे की, शासनाने सर्व प्रकारच्या शाळेत इयत्ता ९ वे १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात स्थानिक प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

आवश्य वाचा- मुलांच्या कपड्यासाठी पैसे कमी दिले आणि विवाहितेने जीवनच संपविले

आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये  मार्गदर्शक सूचनांचे पालन होईल यादृष्टीने थर्मल स्क्रिनिंग, पल्स ऑक्‍सिमीटर, सनिटायझर या सारख्या आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच १७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत संबंधीत शिक्षकांची शक्‍यतो शासकीय केंद्रात "आरटीपीसीआर" कोविड चाचणी व मोफत वैद्यकीय तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी असेही निर्देश या पत्रकात दिले आहेत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner responsibility of the local administration to corona test the teachers