शाळा सुरू करताय, सॅनिटायझर, ऑक्‍सीमीटर देणार कोण? 

किशोर पाटील
Sunday, 15 November 2020

शासनाकडून अनुदान नाही. यामुळे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने साहित्य खरेदीसाठी तत्काळ शाळांना आर्थिक निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आले आहे 

वावडे (ता. अमळनेर): राज्य सरकारने दिवाळीनंतर म्‍हणजे २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या अटी शर्ती पण घातल्या. मात्र शाळा चालू करताना लागणारे सॅनिटायझर, थर्मल ऑक्सीमीटर कोण देणार? याबाबत स्पष्टता नाही. शाळांकडे याबाबत निधी नाही; शासनाकडून अनुदान नाही. यामुळे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने साहित्य खरेदीसाठी तत्काळ शाळांना आर्थिक निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आले आहे 

अनेक अटीतटी घालून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यासाठी शाळांमध्ये सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, थर्मल स्कॅनर ठेवणे अनिवार्य केले आहे. मात्र परिस्थिती ही आहे, की हे साहित्य कुठून आणावे? असा प्रश्न राज्यातील मुख्याध्यापकांना पडला आहे. शहरासह ग्रामीण भागातील शिक्षण संस्था चालक खर्च करू शकत नाही. शिवाय अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत शाळा चालतात शाळेतील स्वच्छता निर्जंतुकीकरण कसं करावं असे अनेक प्रश्न मुख्याध्यापकांच्या समोर उभे आहेत. 

अगोदर तरतुद का नाही?
खरंतर शाळा सुरू करण्याच्या अगोदर सरकारने या गोष्टींचा विचार करायला हवा होता. वास्तविक पाहता संकटांचा सामना करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मायबाप सरकारला मोठ्या प्रमाणावर निधी दिला. त्या निधीतून म्हणजेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून सरकारने याची तरतूद अगोदर करायला हवी होती. मात्र एक रुपयाची तरतूद न करता शाळा सुरू करण्याचे आदेश म्हणजे मुलांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने अगोदर राज्यातील शाळांना कोरोना प्रतिबंधक साहित्य घेण्यासाठी तात्काळ आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. निधी उपलब्ध करून दिला तरच मुख्याध्यापक साहित्य खरेदी करू शकतील. याचा वापर नियोजित वेळेस होईल अन्यथा शाळा चालू करणे धोक्याचे राहिल. फोटो सरकारने हा विचार करून तात्काळ निधी मंजूर करावा नंतरच शाळा चालू कराव्यात अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner school start 23 november but no oximeter