प्रशासन सुमार अन् वाळू उपसा बेसुमार  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

valu chori

शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद करण्याची मागणी केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेच्या सदस्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

प्रशासन सुमार अन् वाळू उपसा बेसुमार 

वावडे (जळगाव) : अमळनेर तालुक्यातील एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसताना वाळूमाफिया मात्र नदीपात्रांचे लचके तोडून अवैधरीत्या बेसुमार वाळूउपसा करीत आहेत. महसूल व पोलिस प्रशासनाचा होणारा कानाडोळा संशयास्पद आहे. यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा नागरिक करू लागले आहेत. कारवाईचा बडगा उचलला जात नसल्यामुळे पांढरपेशांनी तालुक्यात वाळूची बंदिस्त वाहतूक सुरू ठेवली आहे. यामुळे नदीपात्र बकाल होत आहे. 
तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद करण्याची मागणी केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेच्या सदस्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात अवैध वाळू उपसा व अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. 

म्‍हणूनच पावसाचे पाणी जाते वाहून
बेसुमार वाळू उपसा तातडीने बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे अमळनेर व परिसरातील शेतकऱ्यांचे खरिप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिप हंगामात मका कापूस व अन्य पिकांसाठी केलेली लागत मिळणाऱ्या उत्पादनातून निघणे अवघड असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. रब्बी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गहू, हरभरा मका व ज्वारी पिकांना पाणी द्यावे लागते. दरम्यान, या वेळी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अमळनेर तालुक्यातील व परिसरातील भूगर्भात खडकाळ परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्यातच बेसुमार वाळू उपशामुळे नद्यांमध्ये पाणी थांबणार नाही. परिणामी, जलस्रोत कोरडे पडतात. 

..तर प्रशासन जबाबदार 
पिकांना पाणी कमी पडल्याने शेतीमालाचे नुकसान होते. शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडल्याने आत्महत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाळू उपसा तातडीने बंद करण्यात यावा, प्रतिबंध न केल्यास होणाऱ्या परिणामाला पोलिस वाहतूक प्रशासन जबाबदार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top