नियतीने मांडियला असा खेळ पुण्यस्मरण-वाढदिवसाचा एकाच दिवशी जुळला मेळ 

उमेश काटे 
Thursday, 17 December 2020

 जीवनात आनंद देणारी कन्या क्रूर काळाने हिरावून नेल्याने या दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, दैव एका हाताने हिरावून नेते तर दुसऱ्या हाताने भरभरून देते, याचा सुखद अनुभव या दांपत्याला आला.

 अमळनेर : ‘माझ्या काळजाची तार आज कोणी छेडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली...’ या चित्रपटातील गीताचा प्रत्यय येथील सोनवणे शिक्षक दांपत्याला आला आहे. नियतीने असा खेळ मांडला, की दैवाने एका हातातून हिरावले अन् त्याच दिवशी दुसऱ्या हाताने भरभरून दिले. सुख-दुःखाच्या अजब फेऱ्यात ते बांधले गेले. पुण्यस्मरण व वाढदिवसाचा योग्य मेळ साधत हा अजब दिवस ते दर वर्षी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करतात. 

महत्वाची बातमी- खडसेंच्या निकटचा आमदार देणार भाजपचा राजीनामा; पुन्हा निवडणूक लढणार

येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या शिक्षिका श्रीमती एस. पी. अहिरे ऊर्फ सुनंदा सोनवणे, तसेच इंदिरा गांधी विद्यामंदिरचे उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे हे शिक्षक दांपत्य मंगलमूर्तीनगरमध्ये राहतात. एकीकडे सर्व भारतीय १६ डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा करतात. मात्र, या दिवसाचे त्यांच्या जीवनात एक वेगळेच स्थान आहे. बरोबर १५ वर्षांपूर्वी अर्थात १६ डिसेंबर २००५ ला मोठी मुलगी यामिनी हिचे नवव्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. आपल्या जीवनात आनंद देणारी कन्या क्रूर काळाने हिरावून नेल्याने या दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, दैव एका हाताने हिरावून नेते तर दुसऱ्या हाताने भरभरून देते, याचा सुखद अनुभव या दांपत्याला आला. योगायोगाने एक वर्षानंतर १६ डिसेंबर २००६ याच दिवशी त्यांना ऋचा नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. पुनर्जन्मावर विश्वास असो किंवा नसो, मात्र योगायोगाने वर्षानंतर दिवस ही तोच अन् वारही तोच... चेहरा व हास्यही तेच... ‘आमची गोड परी पुन्हा आली’ या गोष्टी ते काही वर्षांपासून अनुभवत आहेत. या दिवशी पुण्यस्मरण करावे की वाढदिवस साजरा करावा, या द्विधा मन:स्थितीत त्यांनी हा दिवस सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्याचे ठरविले.

वाचा- वेशांतर करत पोहचले मद्य कारखान्यात; तीन लाखाचे साहित्‍य जप्त
 

या पार्श्वभूमीवर ते गेल्या १४ वर्षांपासून हा आगळवेगळा उपक्रम राबवित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी या वर्षी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. प्राचार्य पी. एम. कोळी अध्यक्षस्थानी होते. सुभेदार मेजर नागराज पाटील व नायब सुभेदार बी. पी. पाटील यांनी विजय दिवसाचे महत्त्व पटवून दिले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner teacher couple's daughter's remembrance on the same day birthday of social activities