
लॉकडाउनच्या काळात हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केली आणि कांद्याचा भाव गडगडला. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
भडगाव (जळगाव) : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी, तसेच संसदेत शेती संदर्भात नुकतेच मंजुर केलेल्या बिलाविरूध्द व भडगाव तालुका ओला दुष्काळी तालुका म्हणून जाहीर व्हावा; या मागण्यांकरिता भडगांव तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्यावतीने तहसीलकार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
लॉकडाउनच्या काळात हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केली आणि कांद्याचा भाव गडगडला. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने शेतकऱ्यांसंदर्भात अद्यादेश काढून जे एक विधेयक मंजुर केले ते शेतकरी हिताचे नसून ते शेतकऱ्यांच्या मानगूटीवर जबरदस्तीने बसवून देशातील शेतकऱ्यांना समस्येच्या खाईत लोटणारे विधेयक रद्द करावे; अशी मागणी करण्यात आली आहे.
ओला दुष्कार जाहीर करा
पंधरा दिवसापासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा, केळी, लिंबु, मोसंबी ,पेरू, कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबिन, मुग, उडीद आदी पिकांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. याबातचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, तालुका प्रमुख डॉ. विलास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे. के. पाटील आदी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन ः राजेश सोनवणे