शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण कापसाला ४,३११ चा भाव ! 

प्रमोद पवार
Saturday, 19 September 2020

रब्बी हंगामही देखील यावर्षी पाऊस चांगला येईल, अशी आशा असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी पितृपक्ष संपला. नंतर मुहूर्तावर सुमारे १५० क्विंटल कापसाची खरेदी झाल.

कजगाव (ता. भडगाव)  : येथील व्यापाऱ्यांनी गणेश चतुर्थी उत्सवाच्या मुहूर्तावर कापूस खरेदी प्रारंभ केला असून, मुहूर्तच्या दिवशी चार हजार ३११ रुपयांचा भाव जाहीर करून खरेदीला सुरवात केली. पहिल्याच दिवशी १५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. 

येथील कापसाचे व्यापारी दिलीप जैन यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. यावर्षी पावसाची सुरवात चांगली झाली आहे. कपाशीची अवस्था जोमदार आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था व पाण्याची उपलब्धता होती, त्यानी बागायती कपाशीची लागवड केली होती. त्यांची वेचणी सुरू झाली आहे. कोरडवाहू लागवडदेखील दहा- पंधरा दिवसांत वेचणी सुरू होऊ शकते. संपूर्ण पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने नदी- नाले, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांत मुबलक जलसाठा आहे.

रब्बी हंगामही देखील यावर्षी पाऊस चांगला येईल, अशी आशा असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी पितृपक्ष संपला. नंतर मुहूर्तावर सुमारे १५० क्विंटल कापसाची खरेदी झाली, तसेच मका खरेदीचादेखील मुहूर्त आज झाला. पहिल्या दिवशी अकराशेचा भाव मिळाला. या वेळी तीन चार ट्रॅक्टर मका खरेदी झाला. कापूस, मका प्रारंभप्रसंगी व्यापारी दिलीप जैन, मनोज धाडिवाल, नितीन वाणी, चिंतामण पाटील, बापू पाटील, रमेश सोनार, नितीन सोनार, श्याम पवार, सुभाष पाटील, कपूरचंद पाटील, सुरेश महाजन, कोमल पाटील, अरुण पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षाचा कापूस खरेदी झाला नाही. यामुळे यावर्षी भाव कमी मिळणार तर नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शासनाने लवकर हमीभावात कापूस खरेदीची मागणी होत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon Due to good rains, the cotton crop is good and the prices are good