esakal | अवैध वाळू वाहतुकीचा दंड न भरल्याने ग्रामपंचायत कार्यालय केले सील 

बोलून बातमी शोधा

अवैध वाळू वाहतुकीचा दंड न भरल्याने ग्रामपंचायत कार्यालय केले सील }

ग्रामपंचायतीकडून काहीच हालचाल होत नव्हती. दुसरीकडे महसूल प्रशासनाने वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली

अवैध वाळू वाहतुकीचा दंड न भरल्याने ग्रामपंचायत कार्यालय केले सील 
sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव: आतापर्यंत भूसंपादनाचे पैसे दिले नाहीत, म्हणून अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आल्याचे आपण नेहमी पाहतो. मात्र, अवैध वाळू वाहतूक केली, म्हणून ठोठावलेल्या दंडाची रक्कम खेडगाव खुर्द (ता. भडगाव) ग्रामपंचायत भरणा करीत नसल्याने महसूल विभागाने ग्रामपंचायत कार्यालयच सील केले. 

आवश्य वाचा-  महसूल पथकासह तीन महिलांना वाळू डंपरने चिरडण्याचा प्रयत्न 
 

खेडगाव खुर्द (ता. भडगाव) ग्रामपंचायतीने २०१८ मध्ये २८ ब्रास अवैध वाळूउपसा केल्याचे समोर आले होते. त्यानुसार मंडलाधिकाऱ्यांनी पंचनामा करून ग्रामपंचायतीला तब्बल पाच लाख ८७ हजारांचा दंड ठोठावला होता. २०१९ मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दंड भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महसूल प्रशासनाने सातत्याने ग्रामपंचायतीकडे दंडाची रक्कम भरण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, ग्रामपंचायतीकडून काहीच हालचाल होत नव्हती. दुसरीकडे महसूल प्रशासनाने वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर खेडगाव ग्रामपंचायतीचे कार्यालय सील केले आहे. तालुक्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीचे कार्यालय सील करण्यात आले आहे. मंडलाधिकारी तायडे, सुरेश पाटील, तलाठी श्रीमती शेळके, राहुल पवार आदी उपस्थित होते. 

आवर्जून वाचा- चोर पूढे...पोलिस मागे, असा तीन दिवसांपासून सुरू होता खेळ; अखेर पोलिसांची सरशी  ​

...जेव्हा त्याच्यांवरच वेळ येते 
थकबाकी भरत नाही, म्हणून लोकांच्या नळजोडण्या तोडणाऱ्या ग्रामपंचायतीवरच दंडाची रक्कम भरली नाही म्हणून कार्यालयाला सील ठोकण्याची नामुष्की ओढवून घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे गावाचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न गावकारभाऱ्यांना पडला आहे. 

आता वाळूचोरांवर नजर 
‘महसूल’चे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तहसीलदार ढवळे यांनी कंबर कसली आहे. ज्यांच्याकडे अवैध गौण खनिज दंडाची रक्कम आहे, त्यांच्यावर करडी नजर आहे. जे वाहन जमा आहेत, त्यांचे लिलाव करून त्यांच्याकडील रक्कम वसूल करण्याबाबत महसूल प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे