गिरणा पट्ट्यात वाळू लिलावाचे पडघम 

सुधाकर पाटील
Wednesday, 25 November 2020

वाळूच्या लिलावासाठी ठराव मंजूर करावा, गावाच्या विकासासाठी निधी मिळेल, असे आवाहन प्रातांधिकाऱ्यांनी केले.

भडगाव : गिरणा नदीपात्रातील वाळू लिलाव ठराव करण्यासाठी तालुक्यात उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आल्या. यात भडगाव नगरपरिषद हद्दीतील वडधे व टोणगाव तर वाक ग्रामपंचायती हद्दीतील गिरणा नदी पात्रातील वाळू लिलाव करण्यासाठी ग्रामसभांनी मंजुरी दिली तर सावदे येथील ग्रामस्थांनी वाळू लिलावास विरोध केला. 

 

वाचा- जळगावचा ‘फौजदार’अजय देवगण, सुनील शेट्टी सोबत करणार अभिनय

भडगाव तालुक्यात तीन ते चार वर्षांपासून वाळूचा लिलाव झालेला नाही. वाळूचोरी रोखण्यासाठी गिरणा नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्यास महसूल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी तालुक्यात वाक, वडधे व टोणगाव या तीन ठिकाणी वाळू लिलाव करण्यास ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून सहमती दर्शवली आहे. या तिन्ही ठिकाणांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या वेळी तहसीलदार माधुरी आंधळे, प्रशासक डी. ए. चिंचोरे, प्रशासक बी. बी. बोरसे, मुख्याधिकारी विकास नवाळे, तसेच त्या त्या गावातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सावदे येथे ग्रामस्थांचा विरोध 
सावदे (ता. भडगाव) येथे गिरणा नदीपात्रात वाळूच्या लिलावाबाबत महसूल प्रशासनामार्फत गावातील मंदिराजवळ ग्रामसभा घेण्यात आली. यात वाळूच्या लिलावासाठी ठराव मंजूर करावा, गावाच्या विकासासाठी निधी मिळेल, असे आवाहन प्रातांधिकाऱ्यांनी केले. मात्र, सावदे येथील ग्रामस्थांनी त्याला जोरदार विरोध दर्शविला. त्यामुळे सावदे येथील वाळू लिलावासाठी ठरावास नकार मिळाला आहे. 

वाक येथे सहमती 
वाक (ता. भडगाव) येथेही वाळू लिलावासाठी दत्त मंदिराजवळ ग्रामसभा घेण्यात आली. यात ग्रामस्थांनी काही प्रमाणात विरोध दर्शविला. ग्रामस्थांनी आपले मते मांडले. अखेर वाक येथील ठरावास ग्रामस्थांमार्फत मंजुरी देण्यात आली. वाक हद्दीतील गट ६९, ७०, ७१ मधून १ हेक्टर ५ आर. पर्यंत वाळू लिलाव करण्यास ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

 

पालिका हद्दीत दोन ठिकाणी लिलाव 
भडगाव पालिका हद्दीतील वडधे व टोणगाव या दोन्ही ठिकाणाच्या गटातील वाळू उचलण्यास नगरसभेने मंजुरी दिली. शहरातील टोणगाव व वडधे गिरणा नदीपात्रातील वाळू लिलाव करण्याबाबत ठराव मंजुरीसाठी भडगाव नगरपरिषद कार्यालयात नगरसभा घेण्यात आली. सभेत लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी चर्चा केली. या सभेत अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. गिरणा नदीपात्रातील टोणगाव हद्दीतील गट १४६, १४७ व वडधे हद्दीतील गट १४, १५, १६, १७ साठी वाळू लिलावासाठी ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. 

आवश्य वाचा- महसूल आयुक्त म्हणतात पोलिसांनी वाळू माफीयांना केले हद्दपार -

वाळू लिलावासाठी शासनाच्या आदेशानुसार ग्रामसभा घेण्यात आल्या. यात सावदे ग्रामसभेत ठरावास नकार मिळाला तर वाक, वडधे, टोणगाव या तीन ठिकाणच्या वाळू लिलावासाठी होकार देत ठरावास मंजुरी दिली आहे. हे तिन्ही गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत. 
- राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon movement of sand auctions in the vicinity of the girna rivar continues