शिंगाडे मोर्चे काढणारे आता सोंगाडे- खासदार उन्मेश पाटील

सुधाकर पाटील 
Wednesday, 4 November 2020

केळी फळ पीकविम्याचे निकष बदलवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आपली विम्याची रक्कम वेळेत भरून देखील आपल्या हक्काची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्याना मिळाली नाही.

भडगाव : शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी घेरला गेला आहे. शेतीला पाणी असताना वीज मिळत नाही. शेकडो शेतकऱ्यांना डीपी जळाल्याने आणि साधे ऑईल नाही म्हणून त्रागा होतो आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका सातत्याने घेत असून, काहीही गरज नसताना केळी फळ पीकविम्याचे निकष बदलून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला. त्यामुळे शिंगाडे मोर्चे काढणारे आता सोंगाडे झाले आहेत, अशी टीका खासदार उन्मेश पाटील यांनी केली.

आवश्य वाचा- सोबत कोणीच नसल्यामुळे खडसे झाले केविलवाणे- गिरीश महाजन  

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलन करून सरकारला जाग आणण्यासाठी मोठ्या संख्येने ९ नोव्हेंबरच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही खासदार पाटील यांनी केले आहे. भडगाव येथील बुधवारी (ता. ४) विश्रामगृहात आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. या वेळी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, पाचोरा भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. पोपट भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन किरण शिंपी यांनी तर प्रास्तविक अमोल पाटील यांनी केले. 

पीकविम्याचे निकष बदलवून अन्याय 
खासदार उन्मेश पाटील म्हणाले, की केळी फळ पीकविम्याचे निकष बदलवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आपली विम्याची रक्कम वेळेत भरून देखील आपल्या हक्काची विमा नुकसान भरपाई शेतकऱ्याना मिळाली नाही. कारण राज्य शासनाने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि आपल्या हिस्स्याची विम्याची रक्कम भरली नाही. या मुळे शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाने आपली १२६ कोटी रुपयांची रक्कम भरली असती तर आज शेतकरी बांधवांची दिवाळी अंधारात गेली नसती. असा घणाघात करीत खासदार उन्मेष पाटील यांनी केला, तसेच राज्य शासनाच्या नाकर्तेपणाविरोधात नऊ तारखेला आंदोलन करावयाचे असून, आपण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon MP Unmesh Patil said that those who are protesting against banana cultivation have remained silent