सोबत कोणीच नसल्यामुळे खडसे झाले केविलवाणे- गिरीश महाजन  

कैलास शिंदे
Wednesday, 4 November 2020

त्यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते भाजपचे आहेत हे खडसे यांनी सिध्द करून दाखवावे, असे अवाहनही त्यांनी दिले आहे. आपल्यासोबत कोणीही आलेले नाही.

जळगाव : भाजप पक्ष सोडल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र त्यांना वाटत होते तसे झाले नसून त्यांच्या सोबत कोणीच गेले नसल्याने ते हताश झाले आहे. किरकोळ कार्यर्त्यांसोबत फोटो काढून त्यांचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. असे टिकास्त्र माजी आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंवर आज केले.

वाचा- झटपट लाॅटरीच्या नावाखाली सुरू होता सट्टापेढ्यांचा धंदा; ते ही पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर ! 

जामनेर मतदारसंघातील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला होता. त्यावर बोलतांना महाजन म्हणाले, अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. एकनाथ खडसे यांचा हा अत्यंत केविलवाणा प्रकार आहे. भाजपतून राष्ट्रवादीत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबत येतील असा त्यांचा दावा होता, परंतु आज एकनाथ खडसे यांच्या सोबत कोणीच पक्ष सोडून जात नसल्यामुळे आता ते ‘राष्ट्रवादी’ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच बोलावून त्यांच्या गळ्यात पक्षाचे गमचे टाकून प्रवेश केल्याचे दाखविले जात आहे. जामनेर तालुक्यातील दोनशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, आताही आपला दावा आहे, की आपला एकही कार्यकर्ता गेलेला नाही, त्यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते भाजपचे आहेत हे खडसे यांनी सिध्द करून दाखवावे, असे अवाहनही त्यांनी दिले आहे. आपल्यासोबत कोणीही आलेले नाही, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दाखविण्यासाठी खडसे यांचा हा केविलवाणा प्रकार सुरू असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे. 

मुक्ताईनगरचा विचार करा 
खडसे यांच्यावर टिका करताना ते म्हणाले, खडसे यांनी जामनेरचा मुळीच विचार करू नये. त्याची चितांही करू नये. त्यांनी सद्य:स्थितीत मुक्ताईनगरची चिंता करावी, कारण त्यांच्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील जनाधार पूर्णपणे कमी झाला आहे. त्याठिकाणी त्यांनी लक्ष द्यावे. 

खडसेंची प्रतिमा काढली 
भाजप कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्रतिमेच्या वादाबाबत ते म्हणाले, खडसेंची प्रतिमा आम्ही त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्याच दिवशी काढली.. त्यांनतर कोणाचीही प्रतिमा काढण्याचा संबध येत नाही. मात्र सध्या दिवाळीनिमित्त कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात येत असल्याने सर्वच प्रतिमा आम्ही काढल्या आहेत. त्यामुळे (कै.)निखिल खडसे यांची प्रतिमा काढण्याचा संबध नाही. 

अर्णववर सुडाच्या भावनेने कारवाई 
अर्णव गोस्वामी यांच्यावरील कारवाईबाबत ते म्हणाले, राज्य शासन आता सुडाच्या भावनेने कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. आमच्या विरुध्द कोणी बोलले तर त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करू हाच संदेश राज्य शासन देत आहे. पत्रकारांचीही गळचेपी आता राज्य शासनाने सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Girish Mahajan accused Eknath Khadse of being frustrated