"कटिंग'साठीही घ्यावी लागते फोनवरून अपॉइंटमेंट 

श्रीकांत जोशी
मंगळवार, 30 जून 2020

लॉकडाउनमुळे त्यानंतर सतत शंभर दिवस सलून व्यवसाय बंद होता. या काळात व्यवसायाची व पर्यायाने कुटुंबाची खूप परवड झाली. शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर रविवारपासून (ता. 28) सलून सुरू करण्यास काही अटी शर्तीवरून परवानगी दिली. यातही फक्त कटिंग करण्यास परवानगी दिली दाढी व इतर सेवा सुरू करण्यास मनाई आहे.

भुसावळ : कोरोनामुळे कोणत्या व्यवसायाचा रंग केव्हा व कसा बदलेल सांगता येत नाही. आता तर सलून मध्ये कटिंगला जाण्याआधी सलून मालकाची चक्क फोनवरून अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे. डॉक्‍टर, साहेब यांच्या प्रमाणेच अपॉइंटमेंट घेतल्यानंतरच भेटण्याचा मान परिस्थितीमुळे का होईना या व्यवसायातील लोकांना मिळत आहे. 

लॉकडाउनमुळे त्यानंतर सतत शंभर दिवस सलून व्यवसाय बंद होता. या काळात व्यवसायाची व पर्यायाने कुटुंबाची खूप परवड झाली. शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर रविवारपासून (ता. 28) सलून सुरू करण्यास काही अटी शर्तीवरून परवानगी दिली. यातही फक्त कटिंग करण्यास परवानगी दिली दाढी व इतर सेवा सुरू करण्यास मनाई आहे. व्यवसाय सुरू करताना कुटुंबाच्या आरोग्याची चिंता तर आहेच परंतु चुकून दुकानातून संसर्ग झाल्यास पुढील कित्येक महिने गिऱ्हाईक दुकानात पाय ठेवणार नाही ही देखील चिंता आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसायाच्या स्वरूपात थोडा बदल करण्यास सुरवात केली. नेहमीप्रमाणे एकाच वेळी अधिक ग्राहक दुकानात एकत्र येऊ नये म्हणून एका वेळी एकच ग्राहक दुकानात असेल बाकीच्यांची बाहेर बसण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. बाहेर तेवढी जागा असेलच असे नाही व जागा असली तरी सामाजिक अंतर पाळले जाण्याची शाश्वती नाही. यावर काही सलून व्यावसायिकांनी शक्कल शोधून काढली ती म्हणजे अपॉइंटमेंट घेण्याची. ग्राहकाने फोन करून कटिंग करण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची त्याला तुझा कितवा नंबर आहे हे सांगितले जाते, तसेच वेळ दिला जातो. प्रसंगी नंबर आला की फोन करून बोलावले देखील जाते. 
निर्धारित वेळेत ग्राहक आल्यानंतर सुरवातीला त्यास दुकानाबाहेर थांबविले जाते. त्यानंतर ग्राहकासह खुर्ची व इतर साहित्य निर्जंतुक केले जाते. शिवाय ग्राहकास घरूनच रुमाल आणायला सांगितले जातो. या सर्व प्रकारामुळे कटिंगचा दर वाढला आहे. त्यामुळे काही ग्राहक नाराज होतात परंतु ही संपूर्ण काळजी त्यांच्या आरोग्यासाठी आहे हे कळल्यावर त्यांचे समाधानाचे होते. कटिंग झाल्यावर संपूर्ण साहित्य व दुकान पुन्हा निर्जंतुक केले जाते. अशी माहिती श्री गणपती मेन्स पार्लरचे संचालक नीलेश आमोदकर यांनी दिली. तर न्यू रूपाली हेअर आर्टचे संचालक सुमीत अहिरे म्हणाले, मी पीपीई किट घालून कटिंग करतो. शिवाय ग्राहकाला चांगल्या गुणवत्तेचे डिस्पोजल ऍप्रन देतो. वापरून झाल्यावर व्यवस्थित विल्हेवाट लावतो. पूर्वी एक दोन ग्राहक फोन करून कितवा नंबर आहे विचारायचे आता मात्र सर्वच ग्राहकांना फोन करून अपॉयमेंट घ्यावी लागते असे अहिरे यांनी सांगितले. 
 
ग्राहकांना दिलेल्या सुविधांमुळे कटिंगचे दर वाढवावे लागले. पण आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक होते. सलून मध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी सूचना दर्शनी भागात लावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकही योग्य प्रतिसाद देत आहेत. 
-नीलेश आमोदकर, संचालक, श्री गणपती मेन्स पार्लर, भुसावळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal appointment hair cutting in corona virus lockdown