मुलाच्या आग्रहाखातर आईचा चेहरा दाखविला तर उघडकीस आला धक्‍कादायक प्रकार

चेतन चौधरी
Friday, 4 September 2020

कोरोना बाधित किंवा संशयीत रूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍याचा मृतदेह पिशवीत पॅक करून दिला जात असतो. अशात दफनविधी करण्यापुर्वी आईचा चेहरा पहायचा म्‍हणून मुलाने आग्रह धरला. यामुळे केवळ चेहरा दाखविण्यासाठी पिशवी उघडली असताही तर आपली आईच नसल्‍याचे मुलाच्या लक्षात आले. यामुळे प्रशासनाच्या गलथान कारभाराने दोन पॅक केलेल्‍या मृतदेहांची अदलाबदल झाल्‍याचा प्रकार समोर आला. 

भुसावळ : शहरातील मुस्लिम कॉलनीतील कोरोना संशयीत वृद्ध महिलेचा मृतदेह जळगाव येथील मयत वृद्धेच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. ही अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आमदार संजय सावकारे आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात सुपूर्द करून मूळ मृतदेह ताब्यात घेत, त्याचे मुस्लिम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याने तणाव निवळला.

भुसावळमधील मुस्लीम कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तीन दिवसांपूर्वी अस्वस्थ आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी या महिलेस कोविड सेंटरमध्ये हलविले. त्यानंतर गुरुवारी (ता. ३) रात्री महिलेच्या नातेवाईकांना रुग्णालयातून ही महिला मृत झाल्याचे दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले होते. आज (ता. ४) सकाळी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो निगेटिव्ह अहवाल असल्याचे सांगत याचे शासकीय निकष पाळून रितीरिवाजानुसार दफन करण्याच्या सूचना तेथील अधिकाऱ्यांनी दिल्या. 

आग्रह केला म्‍हणून
सदर महिलेच्या नातेवाईकांनी हा मृतदेह दफनभूमीत नेण्यात येत होता. आईच्या देहाचे दफन करण्यापुर्व तिचा चेहरा पहायचाय असा आग्रह मुलांनी धरला. यामुळे मृतदेह उघडण्यात आला. मात्र मृतदेह उघडून पाहिले असता हा मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार आणि आमदार संजय सावकारे यांनी मुस्लिम कॉलनीकडे धाव घेतली. 

तो मृतदेह जळगावातील महिलेचा
या प्रकारामुळे प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस आला. मात्र सदर प्रकार उघडकीस आल्‍यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढून हा मृतदेह कोविड सेंटरमध्ये परत करण्यात आला. भुसावळ येथील मुस्‍लिम कुटूंबाला सोपविण्यात आलेला महिलेचा मृतदेह जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील रहिवासी असलेल्‍या महिलेचा होता.त् तर दादावाडीतील महिलेच्या कुटूंबियांना भुसावळ येथील महिलेचा मृतदेह देण्यात आला होता. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal corona suspected dead body change and handover reletive