खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची पक्षपुनर्बांधणी फिस्कटली 

raver loksabha
raver loksabha

भुसावळ (जळगाव) : भाजपने जिल्ह्यात पक्षाला गळती थांबण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे, तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ, यावल, मुक्ताईनगर येथे गुरुवारी (ता. २९) बैठका पार पडल्या. मात्र, या बैठकीमध्ये खडसे समर्थक पदाधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावली, तर भुसावळ येथील बैठकीत पदाधिकाऱ्यांनी खडसे यांच्यावर अन्याय झाल्याची संतप्त भावना बोलून दाखविली. नाराज कार्यकर्ते आज ना उद्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याने, भाजपची पक्षपुनर्बांधणी फिस्कटली असल्याचे दिसून येत आहे. 
भाजपकडून जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली. मात्र खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात याचा उलट परिणाम दिसून आला. आमदार, खासदार, तसेच नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यात मुक्ताईनगर येथे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह नऊ नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरविली, तर भुसावळ येथील बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, भाजप सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, गिरीश महाजन, बापू महाजन, नगरसेवक बोधराज चौधरी, भाजप गटनेते मुन्ना तेली, पंचायत समिती उपसभापती व इतर सदस्य यांची या वेळी अनुपस्थिती दिसून आली. यावर बोलताना जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी मात्र आपली सावध भूमिका मांडत ज्यांचे राजीनामे आलेले नाहीत, मात्र त्यांच्या अनुपस्थितीबद्दल खुलासा करणार असल्याचे सांगितले. यावरून जरी कार्यकर्ते भाजप पक्षात असले, तरी मनाने ते खडसेंच्या बाजूने असल्याचे दाखवून देत आहेत. 

संकटमोचन महाजनांना रावेर मतदारसंघाची धास्ती 
खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर भाजपला डॅमेज होऊ नये म्हणून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्हाभर, तसेच तालुकास्तरावर बैठका घेण्यात आल्या. जळगाव लोकसभा मतदारसंघातील बैठकांना आमदार महाजन यांची उपस्थिती होती. मात्र रावेर लोकसभा मतदारसंघात बैठकांना त्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता, महाजनांनी बैठकीस येण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. याअगोदरही लोकसभा निवडणुकीप्रसंगी गिरीश महाजन यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील बैठकीस गैरहजेरी लावली होती. 

आगामी निवडणुकांमध्ये बंडाळीची शक्यता 
रावेर लोकसभा मतदारसंघातील पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. निवडून आलेले पदाधिकारी खडसे समर्थक असून, ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले. त्यामुळे सध्यातरी पक्ष सोडण्याचे संभवत नाही. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या वेळी हेच पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादीच्या गोटात सामील होऊन, आघाडीकडून निवडणुकांच्या रणांगणात उतरल्यास याचे नवल वाटू नये. याचा फटका मात्र भाजपला सहन करावा लागणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com