पोलिसांपासून लपण्यासाठी स्मशानभूमीत झोपला आणि काळाने त्याला दंश केला 

चेतन चौधरी 
Tuesday, 17 November 2020

वसुबारसच्या रोजी स्मशानभूमीत रात्रीच्या वेळेस झोपला. रात्री झोपेत त्याला सर्पदंश झाले. मात्र याकडे त्याने दुर्लक्ष केले.

भुसावळ : शहरात रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबाराच्या अफवेनंतर रस्ता लूट करण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपी भारत वाडेकर याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ही घटना घटना मंगळवार (ता. 17) गोदावरी रुग्णालयात घडली. नशिराबाद पोलिस स्टेशनला यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती नशिराबाद पोलिस स्टेशन मधून देण्यात आली.

भुसावाळ शहरात 8 नोव्हेंबर रोजी रेल्वे दवाखाना परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती . यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , शहराचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन कसून चौकशी केली. व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना मुकेश बाविस्कर, पवन रामू सपकाळे  व भारत दिलीप वाडेकर ( रा. हद्दीवाल चाळ )  हे दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.  त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मुकेश बाविस्कर व पवन सपकाळे यांना अटक केली.  त्यांच्याकडून चाकू, फायटरसह इतर हत्यार हस्तगत करण्यात आले होते.  तर भारत वाडेकर हा घटना घडल्यापासून फरार होता. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

स्मशानभूमीत झोपला 

भरत वाडेकर या संशयीत आरोपीला पोलिस शोधत होते. वाडेकर वसुबारसच्या रोजी स्मशानभूमीत रात्रीच्या वेळेस झोपला. रात्री झोपेत त्याला सर्पदंश झाले. मात्र याकडे त्याने दुर्लक्ष केले.  विषबाधा वाढत गेल्याने .  तो स्वतःहून 15 रोजी गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.  त्याचा मंगळवार उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनला डॉ . श्रीकांत जाधव यांच्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही नोंद शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal fugitive accused dies of snake bite