पालिका निवडणूक समोर ठेऊन सीआरपीएफ केंद्राचे राजकारण : आमदार संजय सावकारे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलविण्यात आल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. विरोधक आमदार संजय सावकारे यांच्यावर टीकेची झोड उठत असून, या संदर्भात आमदार सावकारे यांनी खुलासा केला आहे.

भुसावळ : वरणगाव येथील राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलविण्यात आले आहे. यात विरोधक मात्र आगामी पालिका निवडणूक समोर ठेवून राजकारण करीत आहे. या केंद्रासाठी आतापर्यंत मी पाठपुरावा केला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर त्यांनी केंद्र इतरत्र हलविले. विरोधक मात्र आपले पाप झाकण्यासाठी आरोप करीत आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा खुलासा आमदार संजय सावकारे यांनी केला. 

वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलविण्यात आल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. विरोधक आमदार संजय सावकारे यांच्यावर टीकेची झोड उठत असून, या संदर्भात आमदार सावकारे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, वरणगाव येथे १९९६ मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पोलिस प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन झाले होते. तेव्हा मी राजकारणात नव्हतो, २००९ ला आमदार झालो. या काळात माजी आमदारांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही. तोपर्यंत प्रकरण थंड बस्त्यात होते. आमदार झाल्यानंतर याचा पाठपुरावा केला. शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मात्र त्याचा वापर होत नसल्याने त्या परत करण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला होता. या संदर्भात स्वर्गीय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या केंद्रास मंजुरी दिली. मात्र, आता भुसावळ येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आरोप करीत आहेत, त्यांना त्याची काहीएक माहिती नव्हती. भाजप सरकारच्या काळात या केंद्रासाठी पुन्हा पाठपुरावा केला. राज्यात अगोदरच असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्र पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने येथे राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रास मंजुरी देण्यात आली. परंतु राज्यात सरकार बदलल्यानंतर त्यांनी हा प्रोजेक्ट रद्द केला. राज्यात शिवसेना- राष्ट्रवादीचे सरकार आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आरडा ओरड करण्यापेक्षा शासनाकडे पाठपुरावा करावा. माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष माझ्यावर आरोप करीत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात काय केले? माजी आमदारांनी शहरातील व्यापारी संकुल विक्रीसाठी व्यापाऱ्यांचा पैसा खाल्ला. तर मी एमआयडीसीत रस्ते, पाणी, वीज पुरवठा यांची व्यवस्था केली. आज या ठिकाणी चाळीस कंपन्या सुरू आहेत. अनेकांना रोजगार मिळाला, परंतु मोठ्या कंपन्या संदर्भात शहरात अशा खंडणीखोरांमुळे मोठे उद्योग येत नसल्याचाही आरोप आमदार सावकार यांनी केला. 
 
स्वतः चे पाप झाकण्यासाठी आरडाओरड 
भुसावळात मंजूर केलेले टेक्स्टाईल पार्क आणि कृषी संशोधन केंद्र हलविण्यात आले आहे. यासंदर्भात शासकीय निकषाच्या आधीन राहून सरकारने हा निर्णय घेतला. यात भुसावळ तालुक्यात कापसाचे उत्पादन नसल्याने ते जामनेरला हलविण्यात आले. कृषी महाविद्यालयासाठी शंभर एकर जागा नसल्यामुळे ते मुक्ताईनगरला हलविण्यात आल्याचा खुलासा आमदार सावकार यांनी केला. पालिकेतील १५ र्कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळाले होते, तीन कोटी नाट्यगृह साठी मंजूर होते. ही रक्कम शासनाकडे परत गेली आहे. ही बाब पालिकेशी निगडीत असून याचा आमदारांशी काही संबंध नसतो. मात्र विरोधात स्वतःचे पाप झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे आमदार सावकारे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal mla sanjay savkare statement crpf center