पालिका रुग्णालयाची दुरुस्ती तरीही दवाखान्यात पाणीच पाणी

चेतन चौधरी
Monday, 14 September 2020

शहरात कोरोना सोबत इतर आजारांची समस्यासुद्धा वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत दवाखान्यात सोयीसुविधा मिळत नसतील तर नगरपालिका प्रशासनाने केलेल्या नूतनीकरणाच्या कामाचा फायदा काय असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.

भुसावळ : नगरपालिकेच्या (श्री संत गाडगेबाबा) मुख्य दवाखान्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांची स्वब टेस्टिंग सुरू आहे. नुकताच भरपूर पाऊस भुसावळमध्ये झाला आणि त्या दरम्यान दवाखान्यात काही रूममध्ये दयनीय अवस्था झाली. पाणीच पाणीच भरले अश्या परिस्थितीमध्ये स्वब देणे अत्यंत धोकेदायक आहे. मागील वर्षी केल्या गेलेल्या लाखो रुपयांच्या डागडुजी व नूतनीकरणाचा फायदा झालेला नसून या नूतनीकरणमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे, असे स्वब देणाऱ्या नागरिकांनी असे म्हटले. 

शहरात कोरोना सोबत इतर आजारांची समस्यासुद्धा वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत दवाखान्यात सोयीसुविधा मिळत नसतील तर नगरपालिका प्रशासनाने केलेल्या नूतनीकरणाच्या कामाचा फायदा काय असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. भुसावळ नगरपालिका रुग्णालय म्हणजे आता निव्वळ पैसा कमवण्याचा साधन आहे. चांगले रस्ते, शुद्ध पाणी, स्वच्छता आणि आता आरोग्य सुविधा देण्यामध्ये भुसावळ नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी हे प्रत्येक वर्षी नापास झालेले आहे.

दवाखान्यामध्ये सुविधांचा अभाव
कोट्यवधी रुपयांचा निधी नगरपालिका खर्च करणार असेल आणि त्यामध्ये जर अशा प्रकारचे निकृष्ट कामे होत असतील तर नागरिकांनी कर रुपी दिलेल्या पैसाचा अपव्यय झाला आहे म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. जनतेच्या डोळ्यांमध्ये फक्त धूळफेक केली जात आहे. नगरपालिका दवाखान्यामध्ये असलेल्या असुविधा बघितल्या गेल्यास प्रशासन उदासीन असल्याचे जाणवत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करायचे आणि फक्त बिले काढायची आणि पुढच्या वर्षी परत नूतनीकरण करायचे हा कारभार मागील पाच वर्षांपासून सतत सुरू आहे. यामुळे उपचारासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार याची माहिती असून सुद्धा योग्य नियोजन प्रशासनाने केलेले नाहीये. बऱ्याच सुविधा या कागदोपत्री असून प्रत्यक्षात तिथेच काहीच नाही. सुधारणा करा असं वारंवार जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी सांगितले असल्यानंतर सुद्धा दवाखान्यामध्ये कोणतीही सुविधा नाहि.

पालकमंत्र्यांकडे तक्रार
भुसावळ शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना इतर संसर्गजन्य आजार वाढण्याचे निमंत्रण याठिकाणी दिले जात आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असताना अधिकारी गुपचूप कसे? नगरपालिका दवाखाना म्हणजे गोरगरिबांसाठी आधार असतो आणि अश्यात इतर संसर्गजन्य आजाराने ग्रस्त झाल्यास त्यांच्याकडे बघणार कोण? म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून पालक मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडेसुद्धा पोच पाठवली आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार असणारे ठेकेदार व सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच येथे केलेल्या कामांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केली आहे. तसेच भुसावळ नगरपालिकचे मुख्याधिकारी संदीप चद्रावर यांच्याकडे निवदन सादर केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal palika hospital repairing but not clear