भुसावळातील या मार्गाचे रेल्वेकडे हस्तांतरण

चेतन चौधरी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रस्त्यावर कंडारी गाव असून या गावासाठी एकमेव रस्ता असल्याने कंडारीतील रहिवासात बाधा होणार नाही, याची रेल्वे प्रशासनाने दक्षता घ्यावी लागणार असून रस्त्याची देखभाल व दुरुस्ती रेल्वे प्रशासनाला करावी लागणार आहे.

भुसावळ (जळगाव) : शहरातील ५.८ किलोमीटर लांबीचा जुना आरपीडी रोड रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यास यापूर्वीच पालिकेने मान्यता दिल्याने राज्याच्या सार्वजिक बांधकाम विभागाने शासन निर्णय काढत हा रस्ता रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरीत केला आहे. 

शहरातील गांधी पुतळ्यापासून पूर्वेकडे आयुध निर्माणीला जोडणारा रस्त्याची आरपीडीकडे जाणारा म्हणून जुनीच ओळख आहे. शिवाय या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने हा मार्ग अर्थात रेल्वेकडे हस्तांतरीत करण्याची विनंती करण्यात आली होती. तर मध्यंतरी पालिकेने हस्तांतरणास मान्यता दिल्यानंतर राज्य बांधकाम विभगाने हा रस्ता अटी व शर्तींच्या आधीन राहून रेल्वे प्रशासन, भुसावळ यांच्याकडे हा रस्ता हस्तांतरीत केला आहे. 

काय आहे आदेशात
सदरच्या रस्त्यावर कंडारी गाव असून या गावासाठी एकमेव रस्ता असल्याने कंडारीतील रहिवासात बाधा होणार नाही, याची रेल्वे प्रशासनाने दक्षता घ्यावी लागणार असून रस्त्याची देखभाल व दुरुस्ती रेल्वे प्रशासनाला करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी राज्य शासनाकडून कोणतेही अतिरिक्त अनुदान दिले जाणार नाही, असे आदेशात नमूद आहे. या रस्त्याबाबतची सर्व न्यायालयीन प्रकरणे रेल्वे प्रशासन, भुसावळ यांच्याकडून हाताळण्यात येतील, या रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी रेल्वे प्रशासन भुसावळ यांची राहणार आहे.

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal palika rpd road handover railway