उसने पैसे घेवून उभे केले घरकुल; निधीला ब्रेक लागल्‍याने अडचण

चेतन चौधरी
Saturday, 12 September 2020

घरकुलाचा लाभ घेणाऱ्या बऱ्याच लाभार्थींनी आपल्या नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले असून काहींनी व्याजाने पैसे घेऊन घरकुलांची कामे केली आहेत. त्यातच गेल्या आठ महिन्यांपासून चार ते पाच हजार रुपये घराचे भाडे भरावे लागत आहे.

भुसावळ : शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील 300 पैकी 48 लाभर्थींना लाभार्थींना भुसावळ नगरपालिकेने जानेवारी महिन्यामध्ये बांधकामाचे परवानगी पत्र दिले व लाभार्थींनी घरांची कामे सुरू केली व आतापर्यंत 80 टक्के कामे पूर्ण झाली असून, पालिकेने केवळ एक लाखांचे अनुदान दिले आहे. 
घरकुलाचा लाभ घेणाऱ्या बऱ्याच लाभार्थींनी आपल्या नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले असून काहींनी व्याजाने पैसे घेऊन घरकुलांची कामे केली आहेत. त्यातच गेल्या आठ महिन्यांपासून चार ते पाच हजार रुपये घराचे भाडे भरावे लागत आहे. लॉक डाऊमुळे सर्व आर्थिक परीस्थिती बिघडली असून पुढील निधी मिळण्यासाठी नगरपालिकेत संपर्क साधल्यानंतर शासन निधी आला नसल्याने निधी मिळणार नसल्याचे उत्तर दिले जात असल्याने लाभाथींमध्ये निराशा पसरली आहे.

उधारीचे पैसे देण्याचे संकट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने योजना सुरू झाली आहे. त्याच योजनेसाठी केंद्राकडून भुसावळ नगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना एक रुपयांचा सुध्दा निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे लाभार्थींच्या मनात केंद्राप्रती चीड निर्माण होत आहे. बहुतांश लाभार्थ्यांनी नातेवाईक किंवा इतरांकडून उधार उसनवारी ने पैसे घेऊन घरकुलाचे बांधकाम सुरू केले. मात्र आता शासनाचा निधीच मिळत नसल्याने बांधकाम अर्ध्यावरच थांबवावे लागले आहे. तर दुसरीकडे उधार घेतलेले पैसे परत करण्यासाठी नातेवाईक मागणी करू लागले आहेत. सध्या लॉक डाऊनमुळे आधीच सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात हाताला काही कामधंदा मिळत नसल्याने खाण्यापिण्याचे वांधे आहेत. अशा परिस्थितीत उधार फेडण्यासाठी आता पैसे आणावे तरी कोठून असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन रखडलेला निधी मिळवून देण्यासाठी मागणी होत आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना निधी मिळत नाही. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भुसावळ नगरपालिकेला केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचा निधी तत्काळ द्यावा.
- दीपक धांडे, माजी नगरसेवक भुसावळ.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal pm gharkul yojna fund break in goverment