जळगावातील मालधक्क्याचा होणार विकास; पाळधी येथे स्‍थलांतराचा प्रश्‍न कायम 

चेतन चौधरी
Monday, 9 November 2020

पिंप्राळा रेल्वे गेटजवळ होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे होणारे दैनंदिन अपघात मालिका आणि यात निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यामधून शहरवासीयांची सुटका व्हावी, यासाठी हा रेल्वे मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता.

भुसावळ (जळगाव) : जळगाव येथील रेल्वे मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली होती. असे असताना आता रेल्वे प्रशासनाने जळगाव येथील मालधक्क्याचा नव्याने विकास करण्यासाठी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता हा मालधक्का पाळधी येथे हलविण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 
जळगाव रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत मागणी केली होती. येथे होणारी वाहतूक समस्या, पिंप्राळा रेल्वे गेटजवळ होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे होणारे दैनंदिन अपघात मालिका आणि यात निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यामधून शहरवासीयांची सुटका व्हावी, यासाठी हा रेल्वे मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित करण्यात येणार होता. मात्र याकरिता पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अडचण असल्याने हा मालधक्का प्रश्‍न रखडला होता. या अनुषंगाने दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील यांनी भेट घेतली होती. त्या वेळी मंत्री जावडेकर यांनी रेल्वे मालधक्क्याला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी देण्यासाठी तत्काळ आदेश दिल्याने हा मालधक्का पाळधी येथे स्थलांतरित होण्याचे निश्चित झाले होते. मात्र आता रेल्वे प्रशासनाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत मालधक्क्याचा विकास करण्याचे काम हाती घेतले असून, याची निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता हा मालधक्का पाळधी येथे हलविण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. 

पाळधी येथे होणार स्‍थलांतर
शहराच्या पिंप्राळा रेल्वे गेट परिसरातील अनेक वर्षांपासून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण करणाऱ्या रेल्वे मालधक्क्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या दररोजच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आबालवृद्ध, विद्यार्थी, महिलांचे मोठे हाल होतात. याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व समस्या व अडचणी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मांडल्या. मंत्री जावडेकर यांनी तत्काळ दखल घेत परवानगीचे आदेश दिल्याने हा मालधक्का लवकरच पाळधी येथे स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने नव्याने निविदाप्रक्रिया सुरू केल्याने शहरवासीयांची ही समस्या कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे. 

विस्तार आणि विकास होणार 
जळगाव येथील मालधक्का हलविल्यास व्यापारी आणि उद्योगांच्या दृष्टीने खर्चिक बाब ठरणार असल्यामुळे तो न हलविता, जळगाव येथे विकसित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याअंतर्गत रेल्वे प्रशासनाने खासगी विकासकांकडून मालधक्क्याचा विकास आणि देखभाल व दुरुस्तीसाठी निविदा जाहीर केली आहे. याअंतर्गत पार्किंग, कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन, मजुरांसाठी खोल्या केल्या जाणार आहेत. यासोबतच चांदूरबाजार येथेही मालधक्क्याचा विकास केला जाणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal railway department decision maldhakka developed in Jalgaon