भुसावळ जंक्‍शनवर महिनाभरापासून काय घडतेय जरा पहा...

चेतन चौधरी
Friday, 7 August 2020

१९९०च्या दशकात शहरात गुन्हेगारी वाढली होती. त्‍यावेळी डीवायएसपी दीपक जोग यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी शहरातील गुन्हेगारी निपटून काढण्यात यश मिळवले होते. त्यांच्या नावाने गुन्हेगारांच्या अंगावर अद्यापही शहारे येत आहे.

भुसावळ : भुसावळ शहर हे रेल्वेचे जंक्शन स्टेशन म्हणून प्रसिद्ध असले, तरी गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारांचे जंक्शन म्हणूनही प्रसिद्धीस येऊ पाहत आहे. शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गावठी कट्टे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या छत्तीस दिवसात तब्बल एकवीस गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले असल्यामुळे शहरात गावठी कट्टयांचा कारखाना तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

गतवर्षीही गावठी कट्ट्यांचा उत आला होता. त्यामुळे शहरवासीयांनी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासन मात्र गावठी कट्टे रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. १९९०च्या दशकात शहरात गुन्हेगारी वाढली होती. त्‍यावेळी डीवायएसपी दीपक जोग यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी शहरातील गुन्हेगारी निपटून काढण्यात यश मिळवले होते. त्यांच्या नावाने गुन्हेगारांच्या अंगावर अद्यापही शहारे येत आहे. त्यानंतर मुंबई येथे १९९३ साली बॉम्बस्फोट झाला. त्या बॉम्‍बस्फोटातील काही आरोपींनी भुसावळ येथे आश्रय घेतला होता. त्यावेळेपासूनच शहराला गुन्हेगारांचे शहर आहे की? काय असा प्रश्न उपस्थित झाला होता . 
 
कट्टे वापरण्याची फॅशन 
राजकीय कार्यकर्त्यांनी पिस्तूलचे परवाने काढून कमरेला पिस्तूल लावून फिरण्याचे धडाका सुरू केला. तर काही राजकीय पदाधिकारी पोलिस बंदोबस्त घेऊन जनतेत जाऊ लागले. त्यावेळी हा प्रकार संरक्षणास सोबत प्रभाव निर्माण करण्याचाही प्रकार होता. त्यामुळे हाच आदर्श काही दिवसानंतर अवैध धंद्यावाल्यानीही घेतला. कमी वयाच्या तरुणांना एकत्र करायचे, ओल्या पार्ट्या द्यायच्या व कमी श्रमात जास्त पैसे कमवणे, काही ठिकाणी खंडण्या वसूल करायचा, असे काही उद्योग सुरू झाले. यात गावठी कट्टे वापरण्याचाही सर्रास प्रथा सुरू झाली. प्रतिस्पर्ध्यांवर दबाव व प्रभाव निर्माण करण्यासाठी गावठी कट्टे वापरणे सुरू झाले. त्यामुळे आज गावठी कट्टे गल्लोगल्ली सापडत असल्याचे दिसून येत आहे. 
 
निलोत्‍पल यांनी बसवली होती जरब 
प्रशिक्षणार्थी साहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल हे भुसावळ येथे येण्यापूर्वी तीन जुलै २०१५ला माजी नगरसेवक मोहन बारसे यांचा जामनेर रस्त्यावर वाल्मीक नगर समोरच भरदिवसा खून झाला होता. या घटनेने शहर चांगलेच हादरले होते. त्यानंतर या खुनाच्या खटल्यातील आरोपींना धुळे येथून न्यायालयात आणत असताना एसटी बसमध्ये चढून गोळीबार झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच दरम्यान, न्यायालयासमोरही गोळीबार झाला होता. त्यामुळे शहर चांगलेच हादरले होते. त्यानंतर नीलोत्पल यांनी पदभार स्वीकारताच. शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले. व गुन्हेगारी ही बंद झाली होती. 
 
सर्रास गावठी कट्ट्यांचा व्‍यवहार 
शहरात सर्रास गावठी कट्ट्यांचा व्यवहार सुरू आहे मात्र हे गावठी कट्टे कुठून आले? कोण आणीत आहे? शहरात तर कारखाना नाही ना? अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या सीमेवरील काही गावांमधून हे गावठी कट्टे येत असल्याचे चर्चा आहे. यासंदर्भात पोलिस शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत ही कट्टे कुठून येतात याची माहिती आहे. मात्र कारवाई करण्यासाठी पुढे येण्यास कुणीही धजावत नसल्याचे चिन्ह आहे. 

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal railway junction last month 25 gun