esakal | धावत्‍या रेल्‍वेतून ते असे करायचे चोरी...लोहमार्ग पोलिसांनी लावला छडा
sakal

बोलून बातमी शोधा

railway run and mobile robbery

गोपनीय माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन मोबाईल जप्त केले. तसेच एका गुन्ह्यात जप्त मोबाईल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला परत देण्यात आला.

धावत्‍या रेल्‍वेतून ते असे करायचे चोरी...लोहमार्ग पोलिसांनी लावला छडा

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : रेल्वे प्रवासात रेल्वे प्रवाशाचे लक्ष नसताना तसेच दरवाजाजवळ उभे असताना काठीने हातावर मारहाण करीत मोबाईल लांबवण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर गोपनीय माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन मोबाईल जप्त केले. तसेच एका गुन्ह्यात जप्त मोबाईल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला परत देण्यात आला.

आऊटरवर गाडी थांबली अन्‌
अप पठाणकोट एक्स्प्रेसने (११०५८) भुसावळ ते जळगाव प्रवास करीत असलेल्या निलेश जगन्नाथ वाणी (संतोषी डेअरीजवळ जळगाव) आऊटरजवळ गाडी आली असता आरोपी राहुल देविदास तायडे (वय २४, रा. शेगाव, जि.बुलढाणा) याने हाताला काठी मारत ५८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो तक्रारदार वाणी यांना नुकताच परत करण्यात आला.
अहमदाबाद- यशवंतपूरच्या एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक चारमधील बर्थ क्रमांक ५६ वरून नंदुरबार ते जळगाव प्रवास करीत असलेल्या अतुल रामदास बठेजा (आदर्श नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे जळगाव येथे उतरत असताना चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. १४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी विनोद मोरेश्‍वर ईडी (वय ४७, खालचे गाव, ब्रह्मटेक, बालाजी मंदिरामागे, शिरपूर, जि.धुळे) या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नितीन न्हावकर, हवालदार नितीन पाटील, भरत शिरसाठ आदींनी केली.

बुकींग खिडकीवरून मोबाईल लांबवला
भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींग खिडकीवर तिकीट काढण्यासाठी तक्रारदार आशा प्रकाश रंभाळे (२५, धम्मदीपनगर, विश्‍वशांती बुद्धनगरजवळ, नागपूर) या ६ जानेवारीला आल्या असता चोरट्यांनी त्यांचा दहा हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी देवेंद्र खुशाल भगतकर (२१, बांग्लादेश, गुप्ता चौक, नागपूर) यास नागपूर येथून अटक करण्यात आली व आरोपी ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक मनीषा गजभिये, कॉन्स्टेबल आशु शेट्टीयार, कॉन्स्टेबल अमरदीप डोंगरे आदींनी केली.

संपादन ः राजेश सोनवणे